मुंबई : युक्रेनवर रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यामुळे यूक्रेनचे मोठे नुकसान होत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा 12 वा दिवस आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते रशिया आणि युक्रेनमधील या युद्धांचा परिणाम भारत, थायलंड आणि फिलिपाइन्सवर होऊ शकतो. या देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. इंडोनेशियाला मात्र याचा उलट फायदा होणार आहे. तेल आयातदार असल्यामुळे भारताला खूप त्रास होऊ शकतो कारण जगभरात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
आशिया खंडात भारताचे अधिक नुकसान
रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेला धोका निर्माण झालाय. जगभरातील शेअर बाजार वाईटरित्या सावरत आहेत. काही देशांच्या चलन मूल्यावर परिणाम झाला आहे. या भू-राजकीय तणावाचा वाईट परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसू शकतो. प्रसिद्ध वित्तीय आणि संशोधन कंपनी नोमुरा यांच्या अहवालानुसार, युक्रेन संकटामुळे आशियातील सर्वात मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो.
युद्धाच्या काळात परकीय चलनाचे महत्त्व समजून 10 हजार डॉलरहून अधिक रक्कम काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रशियन हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे आर्थिक कंबरडेही मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे.
कच्च्या तेलाचे भाव रडवणार?
कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्याचा परिणाम भारतावर सर्वाधिक होऊ शकतो. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 3 टक्क्यांनी वाढून $105 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीचा आशियातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. वाढती महागाई, वाढती तूट आणि आर्थिक वाढीचा परिणाम यामुळे समस्या आणखी बिकट होईल.
जीडीपी वाढीवर परिणाम
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ताज्या परिस्थितीमुळे भारत, थायलंड आणि फिलीपिन्सला सर्वाधिक फटका बसणार आहे. तर, इंडोनेशियाला तुलनेने फायदा होईल. शुद्ध तेल आयातदार असल्याने भारतालाही खूप त्रास होणार आहे. कारण तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. "कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ग्राहक आणि व्यवसायांवर गंभीर परिणाम होईल," असे अहवालात म्हटले आहे. आमचा अंदाज आहे की तेलाच्या किमतीतील प्रत्येक 10% वाढीमागे, GDP वाढीत सुमारे 0.20% पॉइंटची घट होईल.
महागाई वाढली तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर
QuantEco रिसर्चनुसार, भारताच्या क्रूड बास्केटमध्ये प्रति लिटर 10 डॉलरची वाढ 2022 च्या 9.2 टक्के वार्षिक GDP वाढीच्या अंदाजापेक्षा 10 बेस पॉईंटने वाढ कमी करू शकते. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, क्रूड बास्केटमध्ये 10 टक्क्यांची कायमस्वरूपी वाढ झाल्याने WPI-आधारित महागाई 1.2 टक्क्यांनी आणि CPI-आधारित चलनवाढ 0.3 ते 0.4 टक्क्यांनी वाढू शकते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि तुमच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर होईल. म्हणजेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जिद्दमुळे आता भारतातील रिझर्व्ह बँकेला (RBI) महागाई नियंत्रणासाठी काही मोठे निर्णय घ्यावे लागतील, हे स्पष्ट आहे.