Punjab Election 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या भाच्यावर ईडीच्या छापेमारी प्रकरणाने (Charanjit Singh Channi Nephew news) आता राजकीय रंग घेतला आहे. या प्रकरणात केंद्र सरकार आपल्याला गोवण्याचा कट रचत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी केला आहे.
जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभाग (Income Tax) यासारख्या एजन्सीचा वापर करते असा आरोप चन्नी यांनी केला आहे.
आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा कट रचण्यात आला आहे असा आरोप चन्नी यांनी केला आहे. ईडीने मंगळवारी चन्नी यांच्या नातेवाईकाच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्याचा संदर्भ देत चन्नी यांनी मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.
यात माझा काय दोष?
चन्नी यांनी आपल्या नातेवाईकाच्या निवासस्थानावरील ईडीच्या छाप्यांचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्याशी जोडला आहे. पंजाब दौऱ्यात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटे थांबल्याने पंतप्रधानांना सभेला संबोधित न करताच परतावं लागलं. यावर बोलताना चन्नी म्हणाले, मोदींना परतावे लागले तर यात माझा काय दोष?...माझ्यावर सूड का घेतला जात आहे?'
छाप्यात सापडली 10 कोटींची रोकड
अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील अवैध वाळू उत्खनना विरोधात कारवाई सुरु असून, यासंदर्भात टाकलेल्या छाप्यांमध्ये 10 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले. यापैकी 8 कोटी रुपये चन्नी यांचा भाचा भूपिंदर सिंग उर्फ हनी याच्याशी संबंधित ठिकाणांवरून जप्त करण्यात आले. तर दोन कोटी रुपये संदीप कुमार नावाच्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आले.
2018 च्या एफआयआरमध्ये भाच्याचं नाव नव्हतं
2018 मध्ये नवीनशहर (शहीद भगतसिंग नगर जिल्हा) पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात भुपिंदर सिंगचं नाव नव्हतं. पण अधिकार्यांनी सांगितले की, नवांशहर पोलिसांच्या 2018 चा एफआयआर आणि राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खनन व्यवसायात कथितपणे गुंतलेल्या काही कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.