धक्कादायक! रायफल चोरली, दोनदा पाहणी केली अन्... साक्षीदारच निघाला हल्लेखोर

 Punjab Bathinda camp : 12 एप्रिल रोजी पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळी लागल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस पथकाने एका जवानाला अटक केली आहे.

Updated: Apr 17, 2023, 06:18 PM IST
धक्कादायक! रायफल चोरली, दोनदा पाहणी केली अन्... साक्षीदारच निघाला हल्लेखोर title=
(फोटो सौजन्य - PTI)

Crime News : गेल्या आठवड्यात पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर (Punjab Bathinda camp) झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिलिटरी स्टेशनच्या मेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला होता. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) आता मिलिटरी स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या जवानाला अटक केली आहे. अटक केलेला  जवान हा भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गार्ड (guard) म्हणून तैनात होता. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेला जवान हा या प्रकरणातील एकमेव साक्षीदार होता.

 गेल्या आठवड्यात बुधवारी पहाटे 4.35 च्या सुमारास या जवानाने गोळीबार करत चार जवानांना ठार केले होते. लष्कराच्या तोफखाना दलातील चार सैनिकांचा या गोळीबारात मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांनी जवानांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मेजर आशुतोष शुक्ला यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. एएनआयच्या वृत्तानुसार, पंजाब पोलिसांनी या प्रकरणात 16 एप्रिलला चार जवानांची चौकशी केली होती. त्यानंतर आता तिथल्याच एका गार्डला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सुत्रांच्या वृत्तानुसार, आरोपी जवानाने चौकशीदरम्यान सांगितले की, मृत्यू झालेले चार जवान माझा अपमान करायचे, शारिरीक छळ करायचे. यामुळे मी निराश झालो होतो. दुसरीकडे पंजाब पोलीस मिलिटरी स्टेशनमध्ये घुसून गोळीबार करणाऱ्याच्या शोधात होते. या हल्ल्यानंतर अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे म्हटले जात होते. यानंतर भटिंडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक जी. एस. खुराना यांनी सांगितले होते की, घटनास्थळी इन्सास रायफलची 19 रिकामी काडतुसे सापडली होती. त्याआधीच एक इन्सास रायफल आणि 28 काडतुसे गायब झाली होती.

दुसरीकडे, लष्कराच्या निवेदनानुसार, जवानाने पोलिसांकेड कबूल केले की त्याने 9 एप्रिल रोजी लोडेड मॅगझिनसह शस्त्राची चोरी केली होती आणि ती लपवून ठेवली होती. 12 एप्रिल 2023 रोजी सुमारे साडेचार वाजता, तो कर्तव्याववर असताना, त्याने लपवलेले शस्त्र घेतले आणि पहिल्या मजल्यावर जात चारही जवानांना झोपेतच ठार केले. साथीदारांची हत्या केल्यानंतर त्याने शस्त्र खड्ड्यात फेकले. 12 एप्रिल रोजी प्राथमिक एफआयआर नोंदवताना या जवानाने साध्या वेशातील दोन व्यक्तींचा उल्लेख इन्सास रायफल आणि कुऱ्हाडीचा उल्लेख करत तपास यंत्रणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होता.

दरम्यान, या हल्ल्यात सागर, कमलेश, संतोष आणि योगेश यांचा मृत्यू झाला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हत्येच्या रात्री जवान झोपले आहेत की नाही हे पाहण्यासाठी हत्या करणाऱ्या जवानाने दोनदा फेऱ्या मारल्या होत्या. पहाटे दोनच्या सुमारास जवान झोपी गेले. हत्या करणाऱ्या जवानाने पहाटे तीन वाजता आणि पुन्हा पहाटे चार वाजता येऊन पाहणी केली. शेवटी सेन्ट्री चौकीतून काही दिवसांपूर्वी चोरलेल्या रायफलने जवानांची हत्या केली