नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये घमासानं संपण्याचं नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक नव्या वादांना तोंड फुटत आहे त्यामुळे अंतर्गत कलह वाढत असल्याचं दिसत आहे. पंजाब काँग्रेसमधील राजकीय गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्वांसमोर सिद्धूंना विरोध केला होता. इतकच नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही असंही म्हटलं होतं. आता वाद टोकाला पोहोचला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्ली दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान ते अमित शाहांची भेट घेऊ शकतात अशा चर्चा देखील सुरू आहेत.
एकीकडे राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू असताना सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद मुख्यमंत्रिपदावरून होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी सिद्धू नाही तर चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली.
पंजाबच्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान सिद्धू यांचा सल्ला न घेतल्यानं नाराज आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याशिवाय सुखविंदर रंधावा यांना गृह खाते देण्यात आलं. सिद्धू आणि त्यांचे समर्थक यापूर्वीच या गोष्टीचा विरोध करत होते. मात्र सिद्धू आणि त्यांच्या समर्थकांना डावलून हा निर्णय घेण्यात आला. इतकच नाही तर पंजाबमधील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे नाराज असल्याचीही चर्चा सुरू आहे.
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 28, 2021
पंजाबमध्ये चन्नी यांचं सरकार आल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांचं महत्त्व कमी झालं. त्यांना सातत्याने टाळण्या आल्यानं सिद्धू यांनी अखेर सोनिया गांधींना पत्र लिहिलं. नाराज असलेल्या सिद्धू यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह यांनी सिद्धूवर निशाणा साधला आहे.