Pulwama Attack : २२ फुटीरतावादी नेत्यांसह इतर १५५ जणांची सरकारी सुरक्षा हटवली

त्यांना सुरक्षा पुरवणं म्हणजे..... 

Updated: Feb 21, 2019, 08:05 AM IST
Pulwama Attack  : २२ फुटीरतावादी नेत्यांसह इतर १५५ जणांची सरकारी सुरक्षा हटवली title=

श्रीनगर : बुधवारी जम्मू- काश्मीरमधील १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा प्रशासनाकडून हटवण्यात आली. याशिवाय पीडीपीचे नेते वाहिद पारा आणि आयएएस ऑफिसर शाह फैजल यांच्यासह इतर १५५ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ही कारवाई करण्यात आली आहे. रविवारी मीरनवाज उमर फारुख, अब्दुल गानी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी आणि शबीर शाह यांची सुरक्षा प्रशासनाकडून परत घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. 

सुरक्षेच्या मुद्द्यांवरुन घेण्यात आलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करत ही कारवाई करण्यात आली. राज्य सुरक्षा सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये फुटीरतावादी नेत्यांना पुरवण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था पाहता ही राज्यासाठीच्या संसाधनांची चुकीच्या जागी वापर होत असल्याची चिन्हं असून त्याऐवजी या संसाधनांचा इतर काही चांगल्या कामांसाठी वापर करता येईल ही बाब स्पष्ट करण्यात आली. 

सुरक्षा काढून घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये एस.एस. गीलानी, आगा सय्यद मोसवी, मौलवी अब्बास अन्सारी, यसिन मलिक, सलिम गीलानी, शाहिद उल इस्लाम, जफर अकबर भट, नयीम अहमद खान, मुक्तार अब्बास वझा, मसू अब्बास अन्सारी, फारुख अहमद किचलू आणि इतर काहींच्या नावांचा समावेश आहे.  १४ फेब्रुवारीला जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दहशतवादाला त्यांच्याकडून मिळणारं समर्थन, पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांशी असणारा संबंध या संशयावरुन आणि पुढील अनुचित प्रकाराविषयी योग्य काळजी घेण्याच्या अनुषंगानेच ही पावलं उचलण्यात आल्याचं कळत आहे. 

संशयास्पद कामांमध्ये सहभागी असणाऱ्या आणि ज्यांना प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षाव्यवस्थेची गरज नाही अशा १५५ नेत्यांची सुरक्षा व्यवस्थासुद्धा काढून घेण्यात आली आहे. ज्यामध्ये २०१० मधील आयएएस परीक्षेत जम्मू काश्मीरमधून अव्वल ठरलेलल्या शाह फैजल आणि पीडीपी नेते वाहिद पारा यांच्या नावाचाही समावेश आहे. या सर्व कारवाईनंतर जवळपास १ हजारहून अधिक पोलीस अधिकारी आणि शंभरहून अधिक वाहनं ही पुन्हा एकदा राज्याच्या सेवेत रुजू होण्यास सज्ज झाली असल्याचं कळत आहे.