१०० दिवसांमध्ये राष्ट्रपतींनी काय केलं?

रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती होऊन १०० दिवस झाले आहेत.

Updated: Nov 1, 2017, 09:48 PM IST
१०० दिवसांमध्ये राष्ट्रपतींनी काय केलं?  title=

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती होऊन १०० दिवस झाले आहेत. २५ जुलैला कोविंद यांनी देशाचे १४वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. या १०० दिवसांमध्ये कोविंद यांनी वेळेचा सदुपयोग केला आणि जलद निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केल्याचं राष्ट्रपती भवनातल्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं आहे.

या १०० दिवसांमध्ये राष्ट्रपतींनी वेगवेगळ्या राज्यांचा दौरा केला. भारतासारख्या संघराज्यांमध्ये राज्यांचं स्थान महत्त्वाचं असतं. या वर्षाअखेरपर्यंत राष्ट्रपतींचा सगळ्या राज्यांमध्ये जायचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी दौरा केलेल्या राज्यांमध्ये केरळ आणि कर्नाटकसारख्या बिगर एनडीए शासीत राज्यांचाही समावेश आहे. कोविंद दोन वेळा केरळमध्ये जाऊन आले.

राष्ट्रपती कोविंद यांनी ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान जिबूती आणि इथोपियाचाही दौरा केला. आत्तापर्यंत कोविंद यांनी १२ राजदूत आणि उच्चायुक्तांची भेट घेतली आहे. यामध्ये रशियाचे राजदूत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचणं नागरिकांना अधिक सोपं करण्याचा प्रयास कोविंद करणार आहेत.