मुंबई : Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. त्यासाठी देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजारासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. लवकरच आम्ही बॅटरी उत्पादनात मोठा विकास पाहू शकतो, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगाबरोबरच्या बैठकीत सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी बनविलेल्या बॅटरीचे दर कमी करणे आवश्यक आहे. देशाला ऑटोमोबाईल्ससह बॅटरी तंत्रज्ञानाचे उत्पादन केंद्र बनविणे #AathmaNirbharBharat च्या दिशेने एक मोठे पाऊल असेल.
नितीन गडकरी यांच्या मते, भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वेगाने विकास होत आहे. पीएलआय योजनेअंतर्गत वाहन क्षेत्राला यासाठी 51700 कोटी रुपये देण्यात आले आहेत. बजाज, टीव्हीएस, हीरो त्यांच्या उत्पादनापैकी 50 टक्के निर्यात करीत आहेत.
टाटा नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV) इलेक्ट्रिक व्हेइकल विभागातील सर्वाधिक विक्री करणारी कार आहे. टेस्ला भारतातही इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात प्रवेश करणार आहे. यासह, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणा्यांनाही अनेक प्रकारे फायदा होत आहे.
गडकरी यांच्या म्हणण्यानुसार सरकार इलेक्ट्रिक वाहन धोरणावरही सक्रियपणे काम करत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटीमध्ये (GST) सूट देण्याचाही विचार केला जात आहे. बांधकाम उपकरणे उत्पादकांना इलेक्ट्रिक आणि सीएनजीमध्ये (CNG) रुपांतरित करण्यासाठी प्रोत्साहनांचा विचार केला जात आहे.
गडकरी म्हणाले की, देश ऑटोमोबाईल उत्पादनात जागतिक आघाडीवर आहे. आता या क्षेत्रातील पुढील क्रांती अल्टरनेट इंधनात येईल. या क्षेत्रामधील जगासाठी आपण मार्गदर्शक शक्ती बनले पाहिजे आणि त्यासाठी आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. आम्ही देशात सर्व प्रकारच्या पर्यायी इंधनाचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आहोत. वेगवेगळ्या विभागांनी त्यांच्या स्तरावर उत्कृष्ट काम केले आहे. आम्ही खर्च-प्रभावी आणि टिकाऊ मॉडेलवर वाहतूक विकसित करण्यासाठी वेगवान काम करीत आहोत. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल.