12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचे अनुभव सांगितले

Updated: Jan 30, 2023, 03:36 PM IST
12 राज्य, 145 दिवस, 4080 किमी अंतर आणि राहुल गांधी... 'भारत जोडो यात्रे'चा समारोप title=

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज समारोप झाला. श्रीनगरमधल्या शेर-ए-काश्मिर स्टेडिअमवर भव्य सभा घेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यात्रेचा समारोप झाल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितलं, मी महात्मा गांधी यांच्याकडून शिकलोय की जगायचं असेल तर न घाबरता जगता आलं पाहिजे. मी काश्मिरमध्ये चार दिवस पायी प्रवास केला. पण जसा विचार केला होते, ते घडलं, जम्मू-काश्मिरमधल्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही तर प्रेम दिलं. मनापासून माझ्यावर प्रेम केलं, आपलं मानवलं, प्रेमाने माझं स्वागत केलं.

जम्मू-काश्मिरमध्ये मी कोणत्याही भयाशिवाय चार दिवस चाललो, भाजपचा एकही नेता अशा प्रकारे यात्रा करु शकत नाही. जम्मू-काश्मिरची लोकं त्यांना अशी यात्रा करु देतील असं मुळीच नाही, पण त्यांच्या मनात भीती आहे, म्हणून ते पदयात्रा करु शकत नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 

रोज 8 ते 10 किमी धावतो - राहुल
आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी सांगितलं, मी रोज 8 ते 10 किलोमीटर धावतो, त्यामुळे मला असं वाटत होतं की कन्याकुमारी ते काश्मिर चालताना विशेष त्रास होणार नाही, माझ्यात थोडासा अंहकार आला होता. पण जसं पुढे मार्गस्थ होत गेलो, तसा माझ्यातला अहंकार मोडला. लहानपणी फुटबॉल खेळताना गुडघ्याला दुखापत झाली होती. कन्याकुमारहून जेव्हा यात्रा सुरु केली तेव्हा या दुखापतीने उचल खाल्ली, पण काश्मिर येईपर्यंत हे दुखणं संपलं. 

स्वेटर न घालण्याचं कारण
कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी स्वेटर का घालत नाहीत असा प्रश्न अनेकांना पडला. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यानचा एक भावूक करणारा किस्सा सांगितला. यात्रेदरम्यान मला एक लहान मुलगी भेटली, जी भीक मागून आपलं पोट भरत होती. यात्रेत ती काही वेळ माझ्याबरोबर चालली. ती मुलगी थंडीने कुडकुडत होती. इतक्या थंडीतही ही लोकं स्वेटर घालत नाहीत असा प्रश्न मला पडला. मग मी ठरवलं की मी ही स्वेटर घालणार नाही. यात्रेत अनेक लोकं भेटली. अनेक अनुभव ऐकायला मिळाले असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

जे हिंसाचार करतात, त्यांना वेदनेचं दुःख कळत नाही, मला ही वेदना समजते. पुलवामा हल्ल्यात जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबिवांवर काय परिस्थिती ओढावली असेल हे पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह समजू शकणार नाहीत. मी अमेरिकेत असताना मला फोन आला, माझ्या वडिलांची हत्या झाल्याचं मला सांगण्यात आलं त्यावेळी माझी काय स्थिती हे मलाच माहित आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. जी लोकं माझ्यावर शाब्दिक हल्ला करता त्यांच्याकडून मला काही तरी शिकायला मिळतं. मला त्यांच्या गोष्टींचं वाईट वाटत नाही. देशाला विभागणाऱ्या विचारधारेविरुद्धात आपल्याला उभं राहिचं आहे, आपल्या द्वेष नाही तर प्रेम पसरवायचं आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप झाला. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. 

145 दिवस 4080 किमी यात्रा
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा तामिळनाडूतल्या कन्याकुमारी इथून सुरुवात झाली. ही यात्रा 145 दिवस, 12 राज्यांमधून निघाली. या यात्रेने तब्बल 4080 किमीचा पायी प्रवास केला. त्यानंतर जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगर इथं या यात्रेचा समारोप झाला. श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांनी ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकावला. यात्रेच्या माध्यमातून आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अनुभव शिकायला मिळालं असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं. 

यादरम्यान राहुल गांधी यांनी 12 जनसभा, 100 हुन अधिक बैठका आणि 13 पत्रकार परिषदा घेतल्या. ही यात्रा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर या राज्यातून निघाली.