नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी कुठे लपून बसलाय याबद्दल आत्तापर्यंत कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. परंतु, याचा आता खुलासा होऊ लागलाय. एका इंग्रजी चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी हाँगकाँगहून पळून लंडनमध्ये पोहचला होता. परंतु, आता तो तिथूनही निघालाय. आतापर्यंत नीरव मोदी हाँगकाँगमध्ये असल्याचं सांगितलं जात होतं. सरकारही त्याला पकडण्यासाठी हाँगकाँगच्या आजुबाजुला आपली स्ट्रॅटेजी बनवत होतं. परंतु, नीरव मोदी आता तिथूनही निसटलाय.
इंग्रजी न्यूज चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी 1 जानेवारी रोजी मुंबईहून यूएईसाठी रवाना झाला होता. त्यानंतर तो न्यूयॉर्कला दाखल झाला आणि नंतर हाँगकाँग... भारतीय चौकशी एजन्सी जवळपास आल्याचं पाहिल्यानंतर नीरव मोदी 14 फेब्रुवारी रोजी हाँगकाँग सोडून पळाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हाँगकाँगमधल्या कडक कायद्यांमुळे अधिक दिवस तिथं थांबणं मोदीसाठी शक्य नव्हतं. त्यामुळे त्यानं 14 फेब्रुवारी रोजी हाँगकाँग सोडलं.
चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी 15 फेब्रुवारी 2018 रोजी लंडनला दाखल झाला आणि तिथं जवळपास 1 महिन्यापर्यंत थांबला. यानंतर मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात तो न्यूयॉर्कला निघून गेला. काही बिझनेसमन आणि इतर लोकांनी नीरव मोदीला न्यूयॉर्कमध्ये रिजन्सी हॉटेलच्या आसपास पाहिलं गेलं.
सरकारनं ज्वेल थीफ नीरव मोदीला हाँगकाँगहून भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. ज्यासाठी भारत सरकारनं हाँगकाँगच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडे नीरव मोदीच्या प्रोव्हिजनल अरेस्टसाठी अपील केलं होतं. यामध्ये सीबीआय आणि ईडीच्या मोदीविरुद्ध दाखल झालेली प्रकरणं आणि भारतीय न्यायालयांकडून मोदीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटचा उल्लेख होता.
नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांनी पंजाब नॅशनल बँकच्या मुंबईस्थित ब्रॅन्डीहाऊस ब्रान्चच्या काही कर्मचाऱ्यांसोबत मिळून 13000 करोड रुपयांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली आणि देश सोडून फरार झाला. तेव्हापासून नीरव मोदी आणि मेहूल चौकसीला पकडण्यासाठी चौकशी एजन्सी सलग प्रयत्न करत आहेत. कोर्टानंही त्यांना फरार घोषित करून अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. परंतु, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.