पारंपरिक खेळांना स्टार्ट-अपचं स्वरुप द्या; मोदींचं तरुणांना आवाहन

आमच्या देशात पारंपरिक खेळांचा अतिशय समृद्ध असा वारसा आहे

Updated: Jun 28, 2020, 12:47 PM IST
पारंपरिक खेळांना स्टार्ट-अपचं स्वरुप द्या; मोदींचं तरुणांना आवाहन  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत असताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं, देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीपासून चीनसोबतच झालेली हिंसक झडप पाहता त्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पारंपरिक खेळांविषयीचं देशातील एकंदर वातावरण पाहता त्या धर्तीवर युवा पिढीला या खेळांच्या अनुषंगानं काही महत्त्वाची पावलं उचलण्याचं आवाहनही केलं आहे. 

'आमच्या देशात पारंपरिक खेळांचा अतिशय समृद्ध असा वारसा आहे. तुम्ही पचीसी या खेळाचं नाव ऐकलं असेल. हा खेळ तामिळनाडूत पल्लान्गुलीत, कर्नाटकात अलिगुली मणे आणि आंध्र प्रदेशात वामन गुंटलू या नावाने खेळला जातो. हे सर्व स्ट्रॅटेजी खेळ आहेत', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

देशाच्या विविध भागातील काही पारंपरिक खेळांचा उल्लेथ करत पंतप्रधानांनी आपल्या या बोलण्यातून अनेकांनाच बालपणीच्या आठवणींमध्ये रममाण व्हायला झालं असल्याचं म्हटलं. किंबहुना तुम्ही सारे हे खेळ का विसरलात, त्या दिवसांचा तुम्हाला विसर कसा पडला, असं म्हणत पंतप्रधानांनी पारंपरिक खेळांचा वारसा आजीआजोबा आणि कुटुंबातील वरिष्ठांनी नव्या पिढीकडे सोपवण्याची विनंती केली. 

आम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा

 

पारंपरिक खेळांचं महत्त्व जाणत आणि त्यांना सर्वांपुढं नव्या अंदाजात सादर करण्याचा मुद्दा अधोरेखित करत मोदी म्हणाले, 'सध्याच्या पिढीकडे आणि स्टार्ट अप मध्ये रस असणाऱ्यांकडे एक नवी आणि तितकीच भक्कम संधी आहे. भारतातील पारंपरिक खेळांना आपण नव्या ढंगात सर्वांपुढे आणलं पाहिजे'. स्थानिक गोष्टींना प्राधान्य देण्याचा विडा उचलला गेल्याची बाब अधोरेखित करत पारंपरिक खेळांची लोकप्रियता विस्तारण्यासाठी पंतप्रधानांनी केलेलं आवाहन हा त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.