तिरुपती देवस्थान संपत्तीचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात

'या' संघटनांचा तीव्र विरोध 

Updated: May 26, 2020, 12:25 PM IST
तिरुपती देवस्थान संपत्तीचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात  title=
संग्रहित छायाचित्र

चित्तूर : देशातील सर्वाधित श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नव्या प्रस्तावाने विरोधी पक्ष आणि हिंदू धार्मिक संघटनांना रोष ओढावला आहे. विविध राज्यांमध्ये असणाऱ्या देवस्थानच्या संपत्तीतील जवळपास ५० विविध स्वरुपातील संपत्तींचा लिलाव करण्याच्या प्रस्तावाने आता नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 

सोमवारी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून हा एकंदर वाद पाहता त्याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं. 'तो फक्त एक प्रस्ताव होता. विविध विभागांतून सुचवण्यात आलेल्या या पर्यायाविषयी अद्यापही मंदिर न्यासाच्या सभेमध्ये या मुद्द्यावर अद्यापही विचारविनीमय झालेला नाही', असं सांगण्यात आलं. टीटीडीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या वाय. वी. सुब्बा रेड्डी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना याबाबतची माहिती दिली. 

कोणत्याही प्रकारचा फायदा नसणाऱ्या संपत्तीच्या लिलावाचा प्रस्ताव आणि त्याबाबतचा निर्णय तेलगू देसम पार्टीची सत्ता असतेवेळी २०१६ मधील जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. त्याचसंदर्भात यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात  संपत्तीच्या लिलावाबाबत्या प्रस्तावाविषयी चर्चा झाल्याचं रेड्डी म्हणाले.

तिरुमला तिरुपती देवस्थान अस्थात टीटीडीकडून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ऋषीकेश आणि उत्तराखंड येथे असणाऱ्या आणि कोणताही फायदा नसणाऱ्या संपत्तीमधील ५० विविध प्रकारच्या संपत्ती (भूखंड आदी.)चा लिलाव करण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे. 

लिलावासाठी काढलेल्या या संपत्तीमध्ये घरं, घरांचे भूखंड, रिक्त भूखंड, शेतजमिनीचा समावेश आहे. भाविकांकडून मंदिरात दान स्वरुपात देण्यात आलेली ही संपत्ती बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित असून, त्यातून मंदिर प्रशासनाला कोणताही फायदा होत नव्हती. असं असलं तरीही सध्या मंदिर प्रशांसनाच्या या प्रस्तावित निर्णयाला काही स्तारांतून कडाडून विरोध करण्यात येत आहे. 

 

भाजपकडून या परिस्थितीतीमध्ये ‘SaveLordBalajiLands’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. स्थानिक भाजप नेते जीवीएल नरसिम्हा राव, सुनील देवधर, प्रदेशाध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण आणि इतर काही नेत्यांनी याच घोषवाक्याचा आधार घेत आपले सोशल मीडिया 'डीपी' बदलले आहेत. तर, पवन कल्याणच्या जनकल्याण पक्षानेही या वादात उडी घेत भाविकांच्या भावना दुखावल्या जाण्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. 

तिरुपती देवस्थानच्या संपत्तीचा लिलाव मागे न घेण्याचा निर्णय घेतल्यास वाय एस जगमनोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात जाण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. यादरम्यान, मंदिर न्यासाच्या अध्यक्षांकडून भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.