नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ पाहायला मिळाली. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सोमवारी इंधनाचे दर वाढवले. ज्यामुळे देशात पेट्रोल १८ ते २० पैसे आणि डिझेल २६ ते २८ पैशांनी महागलं. दिल्लीत रविवारी एक लीटर पेट्रोलचा दर ७०.९५ रुपये होता. सोमवारी पेट्रोलचा दर ७१.१४ रुपये झाला. डिझेल रविवारी ६५.४७ रुपये होतं ते सोमवारी ६५.७१ रुपये झालं.
मुंबईमध्ये पेट्रोल ७६.७७ रुपये झालं. तर डिझेल २८ पैशांनी वाढून ६८.८१ रुपये झालं. कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल क्रमश: १८ आणि २० पैशांनी महागलं. सोमवारी त्याचा दर ७३.२३ आणि ७३.८५ रुपये झाला आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेल क्रमश: ६७.४९ आणि ६९.४१ रुपये झालं आहे.
पेट्रोल-डिझेल हे मुख्यत: कच्च तेल महागल्याने वाढतं किंवा रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर वाढतं. ४ ऑक्टोबर २०१८ ला पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये ८४ रुपये होते. मुंबईमध्ये तेच ९१ च्या वर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड ऑईलची ट्रेडिंग ६२.५७ डॉलर सुरु आहे.