नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून सोनिया गांधींनी भाजपवर केलेल्या टीकेवर अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिवाळी अधिवेशनेमध्ये व्यतय आणण्यासाठी मोदी सरकार कमकुवत रणनिती आखत आहे. स्वत:च्या अहंकारासाठी भारतीय लोकशाहीला अंधारात टाकलं जात आहे, असा आरोप सोनिया गांधींनी केला होता.
काँग्रेसनंही याआधी असंच केलं असल्याचं प्रत्युत्तर अरुण जेटलींनी दिलं आहे. निवडणुकीच्या आधी अनेक वेळा काँग्रेसनंही संसदेच्या अधिवेशनाबाबत असं केल्याचं जेटली म्हणाले. २०११मध्ये काँग्रेसनं एक संपूर्ण अधिवेशन विलंबित केल्याची आठवण जेटलींनी करून दिली.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होत आहे. ९ नोव्हेंबर आणि १४ डिसेंबर या दिवशी गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन नेहमी नोव्हेंबरच्या तिसरा आठवड्यात सुरु होतं आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात संपतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार डिसेंबरमध्ये १० दिवसांचं हिवाळी अधिवेशन घेण्याच्या विचारात आहे.