141 MP Suspended Marathi Actress Angry: 'इंडिया' आघाडीतील खासदारांच्या निलंबानाचे सत्र मंगळवारीही सुरु असल्याचं चित्र दिल्लीत पाहायला मिळालं. कथितरित्या आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील आणखी 49 खासदारांवर कारवाई करण्यात आली. मागील 5 दिवसांमध्ये दोन्ही सभागृहातील 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारने नव्या संसद भवनामध्ये खासदारांच्या निलंबनाचा वेगळाच इतिहास रचल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. संसदेमधील सुरक्षाभंगाच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सभागृहात येऊन निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. या प्रकरणाचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटताना दिसत आहेत. असं असतानाच मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंगळवारी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसहीत काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचाही समावेश आहे. मंगळवारच्या खासदार निलंबनानंतर बीबीसीने या संपूर्ण प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये निलंबित खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवलेली प्रतिक्रियाही दिसत आहे. हाच व्हिडीओ तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.
निलंबित खासदारांच्या प्रतिक्रियांचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनीने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विरोधक खासदारांना निलंबित केल्यानंतर आता विधेयकं सरकारला संमत करुन घेता येईतील असा खोचक टोला तेजस्विनीने लागवला आहे. आधीच सरकारकडे बहुमत होतं आणि आता या निलंबनानंतर विरोध करायलाही कोणी नसल्याचं तेजस्विनी म्हणाली आहे. "चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?" अशा कॅप्शनसहीत तेजस्विनीने निलंबित खासदारांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सभागृहातील कामकाजामध्ये विरोधी खासदारांनी प्रक्रिया नियमांचा भंग केला आहे. तसेच त्यांचे वर्तन अथ्यंत आक्षेपार्ह व असल्य असल्याची कारणे देत लोकसभेमध्ये संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी तर राज्यसभेमध्ये सभागृह नेते पीयुष गोयल यांनी विरोधी खासदारांच्या निलंबानाचे प्रस्ताव मांडले. हे प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतरच विरोधी खासदारांच्या निलंबनाचा धडाका सुरु झाला.