अंगाचा थरकाप उडवणारी घटना! आई-बाबा खोलीत झोपलेले, 5 वर्षांचा अक्षत बाल्कनीतून खाली कोसळला अन्...

5 Years Old Boy Fall From Balcony In Delhi: पाच वर्षांचा चिमुरडा खेळत खेळत बाल्कनीत गेला. मात्र, तिथे तोल गेल्याने तो बाल्कनीतून खाली कोसळला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 17, 2023, 03:37 PM IST
अंगाचा थरकाप उडवणारी घटना! आई-बाबा खोलीत झोपलेले, 5 वर्षांचा अक्षत बाल्कनीतून खाली कोसळला अन्...  title=
Parents asleep 5 year old boy falls off balcony dies

5 Years Old Boy Fall From Balcony: दिल्लीत एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एका पाच वर्षांच्या मुलगा घराच्या बाल्कनीतून खाली कोसळला. आठव्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तळ मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाने आरडा-ओरडा करताच या घटनेचा खुलासा झाला आहे. सोसायटीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनी व सुरक्षा गार्डच्या मदतीने चिमुकल्याच्या आई-वडिलांना घटनेबाबत सांगितले. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

खेळत-खेळत बाल्कनीत गेला

प्रशांत सिंह हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते क्यू टॉवरमध्ये पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहतात. शुक्रवारी ते पत्नी, मुलीसह खोलीत झोपले होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. पाच वर्षीय अक्षतला लवकर जाग आली. तेव्हा आई-वडिल झोपले असताना तो खेळत खेळत बाल्कनीत आला. त्यावेळेस खेळत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो आठव्या मजल्यावरुन खाली कोसळला. 

रक्ताच्या थारोळ्यात पडला होता अक्षत

अक्षत खाली कोसळताच मोठा आवाज आला. आवाज ऐकून तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील लोक बाहेर आले. तेव्हा अक्षत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांनी लगेचच अक्षतच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली व सुरक्षा गार्डलाही बोलवून घेतले. सोसायटीतील इतर रहिवाशांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

घटनेनंतर अक्षतच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तर, सोसायटीतील रहिवाशीदेखील या घटनेने हळहळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षतच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती अर्ध्या तासानंतर मिळाली. 

सुरुवातीला मुलगा कोणाचा आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. सिक्युरीटी गार्ड तब्बल २० मिनिटे त्याच्या पालकांना शोधत होता. मुलाच्या चेहऱ्याला रक्त लागले असल्याने त्याला ओळखणेही कठिण जात होते. इतर रहिवाशांकडे चौकशी केल्यानंतर अखेर सिक्युरिटी गार्डला मुलाचे घर सापडले. 

बाल्कनीतून खाली कोसळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षत ज्या बाल्कनीमधून पडला त्याची उंची 4.5 फूट इतकी आहे. तसंच, बाल्कनीच्या रेलिंगमध्ये मोठा गॅपदेखील आहे. याच गॅपमधून अक्षत खाली कोसळला असल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली आहे. 

पाच वर्षांचा मुलगा खाली कोसळल्याचे कळताच आम्ही या प्रकरणी तपास सुरू केला आहे. तर, कुटुंबीयांनी अक्षतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास  नकार दिला आहे. त्यामुळं त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.