चलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या नोटा पाकिस्तान करतंय खरेदी

 तरिही अनेक ठिकाणी अद्याप ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या जात आहेत

Updated: Jun 9, 2018, 11:38 AM IST
चलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या नोटा पाकिस्तान करतंय खरेदी title=

नवी दिल्ली : मोदी सरकारने चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. मात्र, तरिही अनेक ठिकाणी अद्याप ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या जात आहेत. पण, आता या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांना एक मोठा खुलासा केला आहे.

पाकिस्तान करतंय नोटांची खरेदी

तपास अधिकाऱ्यांच्या एका अहवालानुसार, नकली नोटांचा व्यापार करणाऱ्यांकडून गुपचूपपणे चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा नेपाळमध्ये पाठवल्या जात आहेत. भारताने रद्द केलेल्या या नोटा पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहेत.

जुन्या नोटा पाकिस्तानच्या प्रेसमध्ये

पाकिस्तानमधील आयएसआय आणि डी कंपनीचे एजंट हे स्मगलर्सच्या मदतीने जुन्या नोटा खरेदी करत आहेत. तसेच या नोटा पाकिस्तानमधील कराची आणि पेशावर येथील प्रिटिंग प्रेसमध्ये पाठवत आहेत.

सिक्युरिटी वायरचा वापर

कराची आणि पेशावरमधील प्रिंटिंग प्रेसमध्ये पाकिस्तानच्या नोटांची छपाई करण्यात येते. या ठिकाणी असलेले एक्सपर्ट भारतातील रद्द झालेल्या जुन्या नोटांमधील सिक्‍युरिटी वायर काढून ती बनावट नोटांमध्ये वापरत आहे. ही वायर ५००, २००० आणि ५० रुपयांच्या बनावट नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे बनावट नोटा ओळखण्यात अडचण येते.

डी कंपनीचा सहभाग

कराची आणि पेशावरहून या बनावट नोटा डी कंपनीच्या मदतीने दुबई आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये पाठवण्यात येतात. त्यानंतर स्मगलर्सच्या मदतीने या नोटा भारतात पोहचवल्या जातात.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधून लाखो रुपयांच्या बनावट नोटा आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांची चौकशी केली असता समोर आलं की, भारतातील जुन्या नोटा ते नेपाळमध्ये पाठवतात आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी स्मगलर्स त्यांना याचे पैसे देतात.

NIA तर्फे चौकशी सुरु

गृह मंत्रालयातील सूत्रांच्या मते, सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आतापर्यंत किती जुन्या नोटा नेपाळ आणि इतर देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत याची माहिती आता तपास अधिकारी घेत आहेत. तसेच NIA तर्फे बनावट नोटांची तपासणी करण्यात येत आहे.