नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. महात्मा गांधी यांनी म्हटले होती की, कॉंग्रेस विसर्जित व्हावी. त्यामुळे कॉंग्रेस नसती तर ... अशा अनेक उदाहरणांचा पाढा मोदी यांनी राज्य सभेत वाचला.
आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाला आरसा दाखवत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने परिवर्तनाची सुरुवात करावी. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला परिवारवादाची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
काही लोकांचा असा विश्वास आहे की भारताचा जन्म 1947 मध्ये झाला, या विचारसरणीमुळे समस्या निर्माण होतात आणि ज्यांना 50 वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्यांनी काहीच केले नाही.
1975 मध्ये लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. काँग्रेसने घराणेशाहीशिवाय कोणताही विचार विचार केला नाही. भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाहीवादी पक्षांकडून आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार कॉंग्रेस नसती तर काश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले नसते. देशात लोकशाहीची हत्या झाली नसती.
कॉंग्रेस नसती तर देशात जातीवादाची मुळे इतकी घट्ट झाली नसती. कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता. कॉंग्रेस नसती तर पंजाबमध्ये दहशतवाद जन्माला आला नसता. असा घणाघात मोदी यांनी केला.
काँग्रेस सत्तेत असताना देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधात असताना देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.