पाकिस्तानच्या 3 नव्हे तर 20 विमानांची घुसखोरी, लेझर बॉम्बचाही वापर

 भारतीय वायुसेनेच्या सतर्कतेमुळे त्यांचे इरादे अयशस्वी ठरले 

Updated: Feb 28, 2019, 03:52 PM IST
पाकिस्तानच्या 3 नव्हे तर 20 विमानांची घुसखोरी, लेझर बॉम्बचाही वापर  title=

नवी दिल्ली : बुधवारी पाकिस्तानच्या 3 विमानांनी भारतात घुसखोरी केली आणि त्यांना परतवण्यात भारतीय लष्कराला यश आल्याचे वृत्त काल माध्यमांमधून ऐकू आले. पण प्रत्यक्षात 3 नव्हे तर पाकिस्तानच्या 20 विमानांनी भारतात घुसखोरी केल्याचे वृत्त समोर येत आहे. केवळ घुसखोरीच नव्हे तर सैन्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष बनवण्याच्या हेतूने ही विमाने आल्याचेही सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या 3 विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याची माहिती बुधवारी मिळत होती. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकच्या 20 एअरक्राफ्टनी भारतीय सीमा पार केली होती. या विमानांनी लेजर गाईडेड बॉम्बचा वापर देखील केला होता असेही सांगण्यात येत आहे. पण भारतीय वायुसेनेच्या सतर्कतेमुळे त्यांचे इरादे अयशस्वी ठरले अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

 पाकिस्तान सैन्याकडून आज पुन्हा भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय वायुसेनेच्या सतर्कतेमुळे हा पाकिस्तानचा हा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने पुंछमध्ये हवाई हद्दींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचे लष्कर-वायुदलाचे अधिकारी यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत.  

गोळीबार सुरूच 

सलग सातव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जात असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. गेले सात दिवस पाकिस्तानकडून सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील सुरक्षा दलाच्या चौक्यांवरही पाकिस्तान्यांकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सेनेनंही याचा सडेतोड प्रत्यूत्तर दिले.