Vice President Election: विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतिपदासाठी 'या' नावाची घोषणा

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार देण्यासाठी दिल्लीत बैठक पार पडली. 

Updated: Jul 17, 2022, 05:10 PM IST
Vice President Election: विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतिपदासाठी 'या' नावाची घोषणा title=

Vice President Election: विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपदासाठी मार्गरेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार देण्यासाठी दिल्लीत बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यांचा समावेश होता.

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर विरोधकांनीही उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा असतील. शिवसेनेसह 16 राजकीय पक्षांचा अल्वा यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे.  उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनकड विरुद्ध मार्गारेट अल्वा अशी लढत असणार आहे.

14 एप्रिल 1942 रोजी जन्मलेल्या मार्गारेट अल्वा या राजस्थान राज्याच्या राज्यपाल होत्या. 6 ऑगस्ट 2009 ते 14 मे 2012 पर्यंत त्यांनी उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. मार्गारेट अल्वा यांना मर्सी रवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणीही त्याच दिवशी होणार असून निवडणुकीचे निकाल हाती येतील.