ओम बिर्लांनी रचला इतिहास, २० वर्षातलं सर्वात फलदायी अधिवेशन

ओम बिर्ला यांच्या कामकाजावर विरोधकही समाधानी.

Updated: Jul 19, 2019, 02:36 PM IST
ओम बिर्लांनी रचला इतिहास, २० वर्षातलं सर्वात फलदायी अधिवेशन title=

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल एक अनोखा उपक्रम केला. गुरूवारी लोकसभेचा शून्य प्रहर तब्बल ४ तास ४८ मिनिटं झाला. त्यात तब्बल १६२ खासदारांना बोलण्याची संधी मिळाली. यामुळे नव्याने निवडून आलेल्या खासदारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. १७ व्या लोकसभेचं कामकाज अनेक अर्थांनी वेगळं ठरतंय. गेल्या २० वर्षातलं सर्वात फलदायी अधिवेशन असं त्याचं वर्णन केलं जातंय. या अधिवेशनात आत्तापर्यंत २ वेळा लोकसभेचं कामकाज मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलं आहे. कालच्या कामकाजात ओम बिर्ला यांनी तातडीच्या प्रश्नांची निकड लक्षात घेता संध्याकाळी ६ वाजता शून्य प्रहर पुन्हा घेतला.

ओम बिर्ला यांनी म्हटलं की, आतापर्यंत १२८ टक्के कामकाज झालं आहे. लोकसभेत झालेल्या कामाकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केलं. नव्या सरकारनंतर आणि ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर लोकसभेतील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.

लोकसभेचं हे अधिवेशन २६ जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशन आणखी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. लोकसभेत सदस्यांनी बजेटवर १७ तास, रेल्वेवर १३ तास आणि रस्ते व परिवहन संबंधित मागण्यांवर ७.४४ तास चर्चा केली.

संसदेत उशिरा रात्रीपर्य़ंत बैठका होत आहे. कामकाज जोरात सुरु आहे. संसदेच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या पीआरएस संस्थेने देखील एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यामध्य़ये असं म्हटलं आहे की, मागील २० वर्षातील सर्वाधिक कामकाज या अधिवेशनात झालं आहे.

ग्रामीण विकास आणि कृषी मंत्रालयाच्या संबंधित मागण्यांवर १०.३६ तास तर युवा आणि खेळ संबंधित मंत्रालयासंबंधित मुद्द्यांवर ४.१४ तास चर्चा झाली आहे.