नवी दिल्ली : ओडीसातील मोदी नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रतापचंद्र सारंगी यांना देखील पंतप्रधान मोदी कॅबिनेटमध्ये जागा मिळाली आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओडिसातील खासदार प्रताप सारंगी यांनी देखील मंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. सामान्य सर्वसामान्य जनता आणि पंतप्रधान मोदी यांचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्यातील सर्वश्रेष्ठ देऊ असे ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो. मी राजकारणाला राष्ट्र सेवा करण्याचे माध्यम समजतो अशी प्रतिक्रिया प्रताप चंद्र सारंगी यांनी दिली आहे. आमच्या पार्टीमध्ये राष्ट्र प्रथम, पार्टी दुसरी आणि स्वत: अंतिम अशी व्यवस्था आहे. मी पंतप्रधान मोदी आणि सर्वसामान्यांचा विश्वास जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
सर्वसाधारण राहणीमान, प्रवासासाठी सायकल आणि पेंशनची रक्कम गरीब मुलांना देणे यासाठी प्रताप चंद्र सारंगी प्रसिद्ध आहेत. आता 64 वर्षाचे असलेल्या प्रताप चंद्र सारंगी हे कधीकाळी साधु बनून एकांतात जीवन व्यतिथ करण्याच्या तयारीत होते. पण त्यांचे समाजाप्रति समर्पण आणि जनसेवेचा भाव त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात घेऊन आला. सारंगी हे मोठा काळ आरएसएसशी संबंधित आहेत.
यावेस लोकसभा निवडणुकीत ते बालासोर मतदार संघातून 12 हजार 956 मतांच्या फरकाने जिंकले. त्यांनी बीजद उमेदवार रवींद्र कुमार जेना यांना हरविले. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकरणीतील सदस्य त्यांना ओडीसातील मोदी म्हणतात. ते दोनवेळा ओडिसा विधानसभेसाठी निवडले गेले आहेत.