नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत भाषण करताना काही शब्द उच्चारण्यास खासदारांना बंदी घालण्यात आलीय. असंसदीय शब्दांच्या यादीत आणखी काही नव्या शब्दांची भर पडलीय. कोणते आहेत हे नवे असंसदीय शब्द, चला पाहूयात. (now mp should not be used unparliamentary words in parliament know which and how many words unparliamentary)
तुम्ही खासदार असाल आणि लोकसभा किंवा राज्यसभेत भाषण करत असाल तर खास सावधगिरी बाळगावी लागणाराय. भावनेच्या किंवा संतापाच्या भरात तुम्ही कुणालाही हुकूमशाह म्हणू शकणार नाही. कुणाला भ्रष्टाचारी म्हणता येणार नाही. विनाश पुरूष अशा तिखट शब्दांत कुणाची हेटाळणी करता येणार नाही.
कारण लोकसभा सचिवालयानं असंसदीय शब्द आणि वाक्प्रचारांची नवी यादी जाहीर केलीय. त्यामध्ये नवनव्या शब्दांची भर पडलीय. कोणते शब्द खासदारांना भाषणात वापरता येणार नाही, चला पाहूया.
हुकूमशाह, हुकूमशाही, जुमलाजीवी, विनाश पुरूष, शकुनी, जयचंद, भ्रष्टाचारी, तडीपार, निकम्मा, नौटंकी, खलिस्तानी, बालबुद्धी, बहिरं सरकार, काळा दिवस, कोरोना स्प्रेडर अशा अनेक शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय.
त्याशिवाय चौकडी, उल्टा चोर कोतवाल को डांटे, ढिंढोरा पीटना, खून से खेती, गुंडांचं सरकार, गुंडागर्दी, चोर चोर मौसेरे भाई, गुल खिलाना, कांव-कांव करना, तलवे चाटना या हिंदी वाक्प्रचारांवरही बंदी घालण्यात आलीय.
हे शब्द खासदारांनी वापरल्यास ते कामकाजातून काढून टाकण्यात येतील. एवढंच नव्हे तर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना उद्देशून काही वाक्यं उच्चारण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. उदाहरणार्थ तुम्ही माझा वेळ खराब करताय, तुम्ही आमचा गळा दाबा, तुम्ही कुणाच्या पुढं पुंगी वाजवताय? असे शब्दप्रयोग करता येणार नाहीत.
येत्या 18 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनात नव्या नियमाची अमलबजावणी सुरू होणाराय. मात्र विरोधी पक्षानं या बंदी आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सरकारवर टीका करण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांना आता पर्यायी शब्द शोधावे लागणार आहेत.