राहुल गांधी यांचा निर्धार कायम, आज पुन्हा हाथरसला जाणार

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत.  

Updated: Oct 3, 2020, 12:10 PM IST
 राहुल गांधी यांचा निर्धार कायम, आज पुन्हा हाथरसला जाणार   title=

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. याआधी राहुल आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी  हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना उत्तर प्रदेश सरकारने रोखले होतं. यावेळी राहुल गांधी यांना जोरदार धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी दुपारी हाथरसला जाणार आहेत. त्यामुळे आज तरी त्यांना जाण्याची परवानगी मिळते का हे पाहावे लागेल.

आज हाथरसला मीडियाला परवानगी देण्यात आली. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांना आक्रोश प्रथमच जगासमोर आला. आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. बहिणीवर बलात्कार झाला आहे असे सांगून तिने काय गुन्हा केला म्हणून तिच्यावर मृत्यूनंतरही अत्याचार करण्यात आला, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.

हाथरस घटनेनंतर राजकारण चांगलंच तापले आहे. गुरुवारी दुपारी हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी-वाड्रा ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवले. त्यानंतर चालत निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या तयारीत आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलेय, मला कोणीच अडवू शकत नाही. राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मीडियाशी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हथरसकडे रवाना होणार आहे. राहुल गांधी हथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.