एकदा नितिन गडकरी यांनी भाजप सोडण्याचा विचार केला...हा एक खूपच शिकण्यासारखा, छान किस्सा आहे...

नितीन गडकरी हे त्यांची कार्यक्षमता आणि विचार करण्याच्या क्षमतेमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Updated: May 19, 2021, 07:47 PM IST
एकदा नितिन गडकरी यांनी भाजप सोडण्याचा विचार केला...हा एक खूपच शिकण्यासारखा, छान किस्सा आहे... title=

मुंबई : हल्ली देशात सर्वत्र  ही चर्चा चालली होती की, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पार्टी सोडण्याचा विचार आहे आणि ते कधीही  पार्टी सोडू शकतात. खरंतर नितीन गडकरी हे पक्ष सोडणाऱ्यातले नेते नाहीत हे शेंबडं पोरगंही सांगेल,  कारण ही लोकं विचारांवर त्या त्या पक्षाशी जोडली गेलेली माणसं आहेत, कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्या विचारांशी ठाम असतात म्हणून अशी माणसं त्या पक्षात असतात, त्यातील  नितिन गडकरी देखील एक आहेत. मुळात नितिन गडकरी यांच्यासारखी माणसं पक्ष सोडतील, असं बोलणं म्हणजे या घडीला बोलणं नाही तर बडबडणंच ठरणार आहे... हो पण एकदा नितिन गडकरी यांनी भाजपा सोडण्याचा विचार केला होता आणि तो कसा बदलला हा एक खूपच छान किस्सा आहे, नुसता किस्सा नाही यातून खूप काही शिकण्यासारखं आहे..

नितीन गडकरी हे त्यांची कार्यक्षमता आणि विचार करण्याच्या क्षमतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. मंगळवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद साधला. या संवादात त्यांनी बऱ्याच गोष्टींबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये त्यांनी भाजप या त्यांच्या सध्याच्या पक्षाला न सोडण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. कोरोना परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी काही कल्पनांबद्दल बोलताना, त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडून मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी भाजपामध्ये राहण्याचे कारण सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले, "मी विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आलो. ही 1980 ची गोष्ट आहे, जेव्हा अटल जी निवडणूक हरले होते. तेव्हा आमच्या पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. त्यावेळी सर्व लोकं निराश झाले होते. जनता पार्टीच्या इतक्या मोठ्या पराभवामुळे लोकं असे म्हणू लागले होते की अटलजी, अडवाणी जी यांचे भविष्य नाही. या पक्षाला भविष्य नाही. ही पार्टी संपली आहे. या पक्षाला कोणता ही आधार नाही. असे भाष्य पत्रकारांनी सुरू केले होते. "

पक्ष बदलण्याशिवाय मार्ग नव्हता

1980 च्या या घटनेचा संदर्भ देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत ते देखील निराश झाले होते आणि एकदा त्यांनी पक्ष सोडण्याचा विचार केला होता. ते म्हणाले " त्यावेळी मी सुद्धा खूप निराश होतो. लोकं मला सांगायचे की, तुम्ही ठीक आहात, पण तुमची पार्टी चांगली नाही. म्हणून या पार्टीत राहून तुमचे भविष्य चांगले नाही. शक्य तितक्या लवकर पार्टी बदला. पण मी निश्चय केला की, ते काहीही असो, पार्टी आमची आहे, विचार आमचे आहेत, मी पक्षाबरोबर राहण्याचे ठरविले आहे."

नंतरचा विचार केला नाही, भाजप सोडला नाही

जेव्हा सगळेच लोकं एकसारखा सल्ला देतात तेव्हा तुम्हालाही वाटते की, कदाचित सगळे बरोबर बोलत आहेत. पण पुढे नितीन गडकरी यांनी एका पुस्तकाचा संदर्भ देताना त्यातील एका वाक्याने त्याचे भावी आयुष्य कसे बदलले ते स्पष्ट केले. ते म्हणाले की, आयआयटीमध्ये शिकणार्‍या त्यांच्या एका मित्राने, त्यांना एक पुस्तक दिले.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्या जीवनातील घटनांवर आधारित हे पुस्तक आहे. त्यावेळी, वॉटरगेट घटनेमुळे निक्सनवर सर्व स्तरांकडून टीका झाली होती. निक्सनची प्रतिमा इतकी बिघडली होती की, वॉशिंग्टनमधील स्थानिकांनीही त्यांना स्वीकारण्यास नकार दिला.

माणूस पराभवाबरोबर संपत नाही, रण संपल्यावर संपतो

निक्सन यांच्या या पुस्तकात एक प्रेरक वाक्य लिहिले गेले होते. "A man is not finished when he is defeated. He is finished when he quits." या वाक्यामुळे नितीन गडकरींचे आयुष्यच बदलून गेले आहे. या इंग्रजीमध्ये लिहिलेल्या वाक्याचा अर्थ असा आहे की, "एखादी व्यक्ती जेव्हा हरते तेव्हा ती संपत नाही, जेव्हा ती व्यक्ती लढाईतून बाहेर पडते तेव्हा ती संपते".

पुढे गडकरी म्हणतात की, भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनला सांगितले की, लढाई न्याय आणि धर्माची आहे. आपले कर्तव्य बजावण्याच्या भावनेने संघर्ष करावा लागेल. हे समाजाच्या हिताचे आहे, देश हिताचे आहे आणि ते आपल्या भविष्याचेही आहे. या विचारांमुळे पक्ष सोडण्याचा त्यांचा हेतू बदलल्याचे गडकरी यांचे म्हणणे आहे.