नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील असंख्य लोक प्रभावित झाले होते. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नीति आयोगाने आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी गेल्या महिन्यात सरकारला कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. त्यात त्यांनी म्हटले होते की, प्रत्येक 100 रुग्णांमागे 2-3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था तयार ठेवणे गरजेचे आहे.
नीति आयोगाने सप्टेंबर 2020 मध्ये दुसऱ्या लाटेचा अंदाज लावला होता. यामध्ये आयोगाने गंभीर /मध्यम लक्षणे असलेल्या 20 रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता सांगितली होती.
कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर मोठ्या संख्येने रुग्णालयांमध्ये बेड तयार ठेवण्याची सूचना केल्या आहेत. या सूचना दूसऱ्या लाटेच्या एप्रिल ते जूनच्या पॅटर्नवर आधारित आहेत. दुसरी लाट शिखरावर असताना देशात ऍक्टिव केसेस 18 लाख होते. 10 राज्यांमध्ये बहुतांश रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता पडली होती. यामध्ये 2.2 टक्के लोक आयसीयूमध्ये भरती होते.
नीति आयोगाने म्हटले आहे की, बदलत्या परिस्थितीनुसार आपण तयार रहायला हवे. आयोगाने एका दिवसात 4-5 लाख कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबत पुढच्या महिन्यापर्यंत 2 लाख आयसीयू बेड तयार असायला हवे. वेंटिलेटरसोबत 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख बिना आयसीयू बेड, 10 लाख कोविड आयसोलेशन केअर बेड असायला हवे.