नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एकावेळी चौघा बलात्कारींना फाशीची शिक्षा देण्यात आली. गेल्या तीन दशकात १६ दोषींना फाशीची शिक्षा दिली गेली. यामध्ये याकूब मेमन, अफजल गुरु आणि अजमल कसाब हे देखील आहेत.
९ फेब्रुवारी २०१३ ला याआधी तिहार जेलमध्ये अफजल गुरुला फाशीची शिक्षा देण्यात आली. अफजल गुरुला २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दोषी ठरवण्यात आले. अफजल गुरुनंतर तिहार जेलमध्ये आतापर्यंत कोणाला फाशी दिली गेली नव्हती.
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी याकुब मेमनला ३० जुलै २०१५ ला फाशीची शिक्षा देण्यात आली. २७ जुलै २००७ ला विशेष टाडा न्यायालयाने त्याला दोषी ठरवले.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यामध्ये दोषी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ मध्ये पुण्यातील येरवडामध्ये फाशी देण्यात आली. त्याला दोषी ठरवल्यानंतर चार वर्षानंतर फाशी देण्यात आली.
१४ ऑगस्ट २००४ ला बलात्कार प्रकरणी दोषी धनंजय चॅटर्जीला १४ ऑगस्ट २००४ ला कोलकातामध्ये फाशी देण्यात आली. ५ मार्च १९९० मध्ये शालेय मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते.
या महिन्यात गुजरातच्या राजकोटच्या न्यायालयाने २०१८ मध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचा बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका दोषीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.