कोलकाता : कोलकतानजिक नदिया जिल्ह्यातील कृष्णानगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका १४ वर्षांच्या चिमुरडीच्या गळ्यातून डॉक्टरांनी तब्बल ९ सुया बाहेर काढल्यात. 'मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटल'च्या डॉक्टरांनी ही शस्र्क्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
केवळ त्वचेला सुई टोचली तर किती त्रास होतो याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल तरी तब्बल ९ सुया घशात अडकलेल्या असताना या चिमुरडीला किती त्रास होत असेल? याचा अंदाजा आपल्याला येऊ शकणार नाही. हॉस्पीटलच्या कान, नाक, घसा विभागाचे तज्ज्ञ डॉ. मनोज मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली सात डॉक्टरांच्या टीमनं मिळून या चिमुरडीला जीवघेण्या त्रासातून सुखरूप बाहेर काढलंय.
या मुलीचं नाव अपरुपा विश्वास आहे. कृष्णानगरच्या अक्षय विद्यापीठात ती आठवीच्या वर्गात शिकतेय. एक दिवस जेवता-जेवताच ती बेशुद्ध पडली होती. तिच्या घशाला त्रास होत असल्याची तक्रार लक्षात आल्यानंतर वडील तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले... तपासणीत तिच्या घशात सुया अडकल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुरडीच्या गळ्याच्या स्नायुंमध्ये सुया अडकलेल्या अवस्थेत होत्या. मुलीच्या गळ्यातून एक दीड इंचाची तर इतर ८ सुया दोन इंचाच्या आढळल्या.
ज्या पद्धतीनं या सुया मुलीच्या घशात घुसवण्यात आल्या होत्या त्यावरून हे तंत्र-मंत्राचं प्रकरण आल्याचा संशय डॉक्टरांना आहे. या प्रकरणाची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिलीय. वडिलांनी मात्र या सुया मुलीच्या घशात कशा आल्या? याबद्दल माहिती नसल्याचं म्हटलंय. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.