नवी दिल्ली : गुवाहटीहून दिल्लीत आलेल्या एअर एशियाच्या विमानातील टॉयलेटमध्ये बुधवारी सहा महिन्यांचे मृत अर्भक सापडले. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. विमानातील चालक दलाच्या टीमने गोंधळ घातल्यानंतर १९ वर्षांच्या तायक्वांडो खेळाडुने आपण याला जन्म दिल्याचे सांगितले. विमानातील शौचालयाच नवजात भ्रुण सापडल्याचे एअर एशियातर्फे सांगण्यात येतंय. मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये एका टुर्नामेंटला ही महिला खेळाडु निघाली होती. तिच्यासोबत तिचे प्रशिक्षकदेखील होते.
चालक दल नियमित विमानाची पाहणी करत असते. त्या दरम्यान त्यांना टॉयलेट पेपरमध्ये गुंडाळलेलं मृत अर्भक सापडलं. उड्डाण क्र. ५७८४ हे इंफाल येथून निघालं होतं. विमान साधारण साडेतीन वाजता इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी ३ टर्मिनल्सवर उतरले होते. गुवाहटीमध्ये विमानात बसलेल्या महिलेने प्रसुतीपूर्व बाळाला जन्म दिला होता. पोलिसांनी अर्भकाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलंय तर महिलेला मेडिकल तपासणीसाठी पाठवलंय.
महिला खेळाडु गर्भवती असण्याबद्दल आम्हाला माहिती नसल्याचं तिच्या प्रशिक्षकांनी सांगितलं. तिच्या फ्लाइट उड्डाणाच्या डॉक्यूमेंटमध्येही यासंदर्भात काही उल्लेख नव्हता. विमानातील सर्व महिलांच्या तपासणीनंतर या महिलेची ओळख पटवण्यात आल्याचे एअर एशियाने सांगितले. डीजीसीएला यासंदर्भात माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.