नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात पार पडली. यात गुजरातमधल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं सांगण्यात येतंय. १०० उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाचे केंद्रातले अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी भाजपाची पहिली यादी १७ नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे.
७० जागांसाठी राज्यातून प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव सुचवण्यात आल्यामुळे या जागांवर उमेदवारी निश्चित मानली जातेय. मुख्यमंत्री विजय रुपानी राजकोट पश्चिम मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा इथून निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. काही जागांसाठी २ किंवा ३ नावांची शिफारस करण्यात आलीये. आजच्या बैठकीत ही नावं निश्चित होतील, अशी माहिती आहे.