नवी दिल्ली : तुम्ही नवीन कार अथवा बाईक घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे. नवीन कार किंवा दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी आता एका वर्षाचा नाही तर ३ ते ५ वर्षांचा विमा एकत्र काढावा लागणार आहे. नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा आणि मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक करण्यात आला आहे.
याआधी नवीन वाहनांना एक वर्षाचा विमा बंधनकारक होता. नवीन नियमामुळे वाहन खरेदीदारांना तीन आणि पाच वर्षांच्या विम्याचे शुल्क एकत्रित द्यावे लागणार आहे. त्यामुळे नवीन वाहनांची खरेदी महागणार आहे. उद्या म्हणजेच १ सप्टेंबर २०१८पासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे.
देशभरातील रस्त्यांवर एका वेळेला जवळपास १८ कोटी वाहने धावतात. त्यापैकी केवळ सहा कोटी वाहनांना किमान थर्ड पार्टी विमा असतो. उर्वरित वाहने विम्याशिवायच रस्त्यावर धावत असतात. देशात दर वर्षी रस्ते अपघातात दीड लाखांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. विमा नसलेल्या वाहनांमुळे मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून मदत करताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. देशातील हे चित्र बदलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानने वाहन नोंदणी करताना काढाव्या लागणाऱ्या विम्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व विमा कंपन्यांना तीन आणि पाच वर्षांच्या विम्याची योजना तयार करण्याची सूचना केली होती.
थर्ड पार्टी विमा : थर्ड पार्टी विमा म्हणजे कार किंवा दुचाकीचा अन्य व्यक्ती, वाहन किंवा घटकाशी अपघात झाल्यास, त्या तिसऱ्या व्यक्तीला त्या विम्याचे संरक्षण मिळते. यामध्ये विमाधारकाला स्वत:ला विम्याचे संरक्षण मिळत नाही. दुचाकीसाठी एक वर्षासाठी सरासरी ७०० ते १००० रुपये आणि मोटारींसाठी २५०० ते ३००० रुपये विमा शुल्क आहे.
कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा : या प्रकारच्या विम्यामध्ये वाहनधारक आणि अपघातग्रस्त दोन्हींना विम्याचे संरक्षण मिळते. या विम्यासाठी दुचाकीधारकांकडून सरासरी ३५०० ते ४००० हजार रुपये आणि मोटारधारकांकडून १५ ते १७ हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.