NEET-PG Exam: नुकतंच नीटचा पेपर फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पहायला मिळालं. अशातच रविवारी होणारी नीट पीजीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परीक्षा होण्याच्या अवघ्या ११ तास अगोदर सरकारने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्पर्धात्मक परीक्षांच्या पेपर लीकच्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबाबत 23 जून 2024 रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच कळवण्यात येणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाने विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाचं म्हणणं आहे.
IMPORTANT ALERT
NEET-PG Entrance Examination, conducted by National Board of Examination postponed
New date will be notified at the earliesthttps://t.co/A5DLwBhgI8
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 22, 2024
अधिक माहितीसाठी परीक्षार्थी nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर भेट देऊ शकतात. नीट पीजीची ही परीक्षा 23 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता होणार होती.
NEET-UG परीक्षेतील कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारला 23 जून रोजी होणारी NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
दुसरीकडे NEET-UG आणि UGC-NET परीक्षेतील घोळ प्रकरणी सरकारने अॅक्शन मोडमध्ये आली आहे. यावेळी एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं असून प्रदीप सिंह खरोला हे एनटीएचे नवे संचालक असणार आहेत.