'या' देशात 96 % शाळांमध्ये कंडोम वेंडींग मशिन

96 टक्के हायस्कूलमध्ये कंडोम वेंडिंग मशीन्स 

Updated: Apr 1, 2021, 12:05 PM IST
'या' देशात 96 % शाळांमध्ये कंडोम वेंडींग मशिन title=

पॅरिस : फ्रान्समधील (France)96 टक्के हायस्कूलमध्ये कंडोम वेंडिंग मशीन्स (Condom Vending Machines) बसविण्यात आल्या आहेत. सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लहान वयातच गर्भधारणेचा धोका कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या मशीनमधून आवश्यकतेनुसार कंडोम काढता येऊ शकतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे समोर आले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी फ्रान्सवर एड्सचा वाईट परिणाम झाला होता. हे लक्षात ठेवून सरकारने सुरक्षित लैंगिक संबंधासाठी शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन बसवल्या.

फ्रान्समध्ये 1992 मध्ये प्रथम कंडोम वेंडिंग मशीन बसवण्यात आली. त्यावेळी सरकारच्या निर्णयाला सर्व स्तरातून जोरदार विरोध होता. विशेषत: शाळा प्रशासन आणि समाजातील काही घटकांनी यावर आक्षेप घेतला. यावेळी केलेल्या जनजागृती अभियानाचा फायदा सरकारला झाला आणि लोकांनी हा निर्णय मान्य केला. गेल्यावर्षी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार फ्रान्समध्ये हायस्कूल, सार्वजनिक शाळा आणि खासगी शाळांपैकी जवळपास 96 टक्के शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन आहेत.

स्टॅटिस्टाच्या (Statista) अहवालानुसार, 2019 मध्ये Île-de-France या प्रदेशात कंडोमची सर्वाधिक संख्या 26 दशलक्ष इतकी होती. यानंतर ओव्हिग्ने-रौन-अल्पेसमध्ये सुमारे 14.6 दशलक्ष कंडोम विकले गेले. तरुण पिढीमध्ये सुरक्षित सेक्स प्रॅक्टिसला (Safe Sex Practice) प्रोत्साहन देणारा फ्रान्स हा एकमेव देश नाही. अमेरिकेतल्या सार्वजनिक शाळांमध्येही कंडोमचे वितरण करण्यात आले.

असुरक्षित सेक्स एड्सच्या कारणांमध्ये प्रमुख आहे. हे लक्षात घेऊन जगभरातील सरकारे आणि अशासकीय संस्था यासंदर्भात जागरूकता मोहिम राबवतात. गेल्या दशकात एचआयव्हीचा प्रसार कमी होण्यामागे हेच कारण आहे. यूएनच्या अहवालात असे म्हटले आहे की 2018 मध्ये भारतात (India)88 हजार नवे रुग्ण आढळले. तर 69 हजार लोक एड्समुळे मरण पावले आहेत. जगातील एकूण एड्स रुग्णांपैकी सुमारे 10% रुग्ण भारतात आहेत. दुसर्‍या अहवालानुसार दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियानंतर भारतात एड्सचे रुग्ण सर्वाधिक आहेत.