गुजरात : गुजरातमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अखेर संपुष्टात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं गुजरातमध्ये स्वतंत्रपणे ६५ जागांवर लढणार आहे. दुस-या टप्प्यातील अर्ज भरण्याचा काल अखेरचा दिवस होता. मात्र काँग्रेसनं जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा न केल्यामुळे अखेरच्या क्षणाला आपली उमेदवारांची यादी जाहीर केली.
गुजरातमध्ये राष्ट्रवादीनं वेगळी चूल मांडल्यामुळे याचा फायदा सत्ताधारी भाजपला होणार असल्याची चर्चा आहे. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रपणे लढले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र आता आघाडी तुटल्यामुळे राष्ट्रवादीला फायदा होणार नसला तरी भाजपविरोधी मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
पहिल्याच टप्प्यात काँग्रेसनं पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघात आपला उमेदवार घोषित केल्यामुळेच आघाडी फिसकटल्याचं पुढं आलंल. कारण या ठिकाणी कंधाल जडेजा हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. जडेजा यांनी गुजरात राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजपला खुलं समर्थन दिलं होतं. त्यामुळेच काँग्रेसनंही कोणतीही चर्चा न करता त्यांच्या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला.
मात्र दुस-या टप्प्यात तरी आघाडी होईल अशी आशा प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसनं चर्चेचीही तयारी न दाखवल्यामुळे अखेर आघाडी तुटली.