दंतेवाड्यात भारतीय जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांचा हल्ला; चौघांचा मृत्यू

गेल्या १५ दिवसांत दंतेवाड्यात सुरक्षा दलांवर झालेला हा दुसरा नक्षली हल्ला आहे.

Updated: Nov 8, 2018, 02:45 PM IST
दंतेवाड्यात भारतीय जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांचा हल्ला; चौघांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: छत्तीसगढच्या दंतेवाडा येथे गुरुवारी नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांच्या बसवर हल्ला चढवला. येथील बचेली परिसरातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन ही बस जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

मात्र, उपचारादरम्यान यापैकी एका जवान शहीद झाला आहे तर तीन स्थानिक नागरिकही मृत्यूमुखी पडले आहेत. आणखी काही जवान गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

गेल्या १५ दिवसांत दंतेवाड्यात सुरक्षा दलांवर झालेला हा दुसरा नक्षली हल्ला आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबरला दंतेवाड्यात नक्षलींनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.