नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी- कमल हसन

स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता.... 

Updated: May 13, 2019, 12:02 PM IST
नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी- कमल हसन title=
कमल हसन

नवी दिल्ली : मक्कल निधी मय्यम या पक्षाचे संस्थापक आणि अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या कमल हसन यांनी रविवारी एक वादग्रस्त विधान केलं. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता आणि तो म्हणजे नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधी यांना मारलं होतं, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं. अरवाकुरीची येथे १९ तारखेला होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या धर्तीवर आपल्या पक्षासाठीच्या प्रचारसभेत हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलं. 

'प्रचार करत असताना या संपूर्ण भागात मुस्लिमांचं प्राबल्य असल्याने आपण हे विधान करतोय असं आपल्याला वाटेल पण तसं नाही. यापीर्वीही आपण हेच विचार व्यक्त केले होते', असं कमल हसन यांचं म्हणणं होतं. सभ्य भारतीयांना तिरंग्याचा अभिमान आहेच शिवाय त्यांना देशात समानताही हवी आहे ज्या समानतेचे आपणही पुरस्कर्ते आहोत', असं वक्तव्य त्यांनी केलं. 

२०१७ मध्येही हसन अशाच अका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. कट्टर हिंदुत्तववादासाठी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ज्या माध्यमातून त्यांनी भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांला लक्ष्य धरलं होतं. राजकीय वर्तुळात सक्रिय असणाऱ्या कमल हसन यांनी २१ फेब्रुवारी २०१८ ला मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना केली होती. निवडणुकांच्या रिंगणात त्यांचा हा पक्ष राजकीय पटलावर सक्रिय झाला आहे. विजेरी म्हणजेच बॅटरी हे त्यांच्या पक्षाचं चिन्हं आहे. तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये येणाऱ्या एका नव्या युगासाठी एक महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचा निर्धार त्यांच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता खरंच त्या अनुशंगाने हसन यांचा पक्ष काम करतो, का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.