भोपाळ: नथुराम गोडस हा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा मारेकरी होता. त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करणे, ही देशभक्ती असू शकत नाही. तो देशद्रोहच ठरतो, असे काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्याबद्दल नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांनी जनतेसमोर येऊन देशाची माफी मागितली पाहिजे. मी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. कारण, नथुराम गोडसे हा मारेकरीच होता. त्यामुळे त्याचे उदात्तीकरण ही देशभक्ती नसून देशद्रोहच ठरतो, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून पूर्णपणे कोंडी केली. अखेर टीकेचा ओघ वाढल्यानंतर भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी पक्ष साध्वींच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाने याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी जनतेची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भाजपने त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे.