नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी बुलंदशहर हिंसेबद्दल केलेल्या विधानाच्या प्रतिक्रिया देशभरात उमटल्या. पोलीसाच्या मृत्यूपेक्षा गायीला जास्त महत्व असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच मुलांच्या सुरक्षेची काळजीही त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना प्रमुख अमित जानी यांनी नसीरुद्दीन यांच्यासाठी पाकिस्तानचे तिकिट बुक केले आहे. अनेकांनी नसीरुद्दीन यांच्यावर टीका केली. या वक्तव्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला. नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी भारतावर टीका केली होती. नसीरुद्दीन आता जे म्हणत आहेत ते मोहम्मद अली जीना यांनी आधीच म्हटले होते. भारतात अल्पसंख्यांकांवर नेहमी अन्याय होत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले.
इम्रान खान यांच्या वक्तव्याचा नसीरुद्दीन शाह यांनी समाचार घेतला. इम्रान खान यांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी इतरांच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:चा देश सांभाळण्याकडे लक्ष द्यावे. आमच्या देशात गेल्या ७० वर्षांपासून लोकशाही आहे. त्यामुळे स्वत:चे प्रश्न कसे हाताळायचे, हे आम्हाला ठाऊक आहे, असे शाह यांनी सांगितले. यानंतर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील इम्रान खान यांना आरसा दाखवला आहे.
According to the Pakistani Constitution, only a Muslim is qualified to be President. India has seen multiple Presidents from oppressed communities. It's high time Khan sahab learns something from us about inclusive politics & minority rights.https://t.co/qarmZkqdhH
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 23, 2018
ओवेसी यांनी यासंदर्भात ट्वीट करत, पाकिस्तानच्या संविधानानुसार केवळ मुस्लिमच राष्ट्रपती बनण्याची योग्यता राखतात. पण भारताने विभिन्न शोषित समुदायाचे राष्ट्रपती पाहिले आहेत. अल्पसंख्यांकांचे अधिकार आणि समावेशी राजकारण हे इम्रान यांनी आमच्याकडून शिकावे असं म्हणत असद्दुद्दीन यांनी इम्रान यांना फटकारलं.
या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे वक्तव्य नसीरुद्दीन शाह यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. मात्र, नसीरुद्दीन शाह आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझे काय चुकले की मला गद्दार ठरवले जाते आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या देशात आणखी किती स्वातंत्र्य हवं? असा प्रश्न अभिनेते अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शाह यांचे नाव न घेता विचारला.