मंदिरातून चोरलेल्या कोट्यवधींच्या मूर्ती चोरांकडून परत... ती रहस्यमय चिठ्ठी आहे त्यामागील कारण

9 मे रोजी चित्रकूट जिल्ह्यातील सदर कोतवाली भागातील तरौन्हा येथील प्राचीन बालाजी मंदिरात चोरी झाली.

Updated: May 16, 2022, 10:42 PM IST
मंदिरातून चोरलेल्या कोट्यवधींच्या मूर्ती चोरांकडून परत...  ती रहस्यमय चिठ्ठी आहे त्यामागील कारण title=

मुंबई : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातून एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. जे जाणून अनेकांना धक्काच बसला आहे. खरंतर चोर जेव्हा चोरी करतात तेव्हा ते ती चोरी करण्यासाठी खूप अभ्यास करतात आणि मगच ती चोरी करतात. त्यामुळे त्यांच्याकडून चोरलेली वस्तु पुन्हा मिळेल, याची शक्यता फारच कमी असते. परंतु उत्तर प्रदेशातील चोरांनी चोरी केलेल्या मुर्ती पुन्हा मंदिरात आणून ठेवल्या, एवढंच काय तर त्यांनी माफी देखील मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 मे रोजी चित्रकूट जिल्ह्यातील सदर कोतवाली भागातील तरौन्हा येथील प्राचीन बालाजी मंदिरात चोरी झाली. या मंदिरातून अष्ट धातूच्या 14 मूर्ती चोरीला गेल्या होत्या.

परंतु रविवारी चोरट्यांनी या मूर्ती महंतांच्या घराबाहेर पुन्हा आणून ठेवला. शिवाय या चोरट्यांनी मूर्तींसोबत एक पत्रही लिहिले होते. या पत्रावर त्यांनी जे लिहिलंय ते धक्कादायक आहे.

या चोरट्यांनी पत्रात लिहिलं की, 'आम्हाला मुर्ती चोरल्यानंतर आम्हाला रात्री भीतीदायक स्वप्नं पडू लागले, त्यामुळे आम्ही या मुर्ती परत करत आहोत. आमच्याकडून चूक झाली.'

सदर कोतवाली कारवीचे एसएचओ राजीव कुमार सिंह यांनी सोमवारी सांगितले की, '9 मेच्या रात्री तरौहा येथील प्राचीन बालाजी मंदिरातून कोट्यवधी रुपये किमतीच्या अष्ट धातूच्या 16 मूर्ती चोरीला गेल्या. या संदर्भात महंत रामबालक यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत रामबालक यांच्या घराबाहेरील गोणीतून रविवारी 16 पैकी 14 चोरीच्या मूर्ती रहस्यमयरीत्या सापडल्या. त्यांनी सांगितले की, मूर्तींसोबत चोरट्यांनी लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे, ज्यामध्ये 'आम्हाला रात्री भयानक स्वप्ने पडतात', असे लिहिले आहे. भीतीपोटी आम्ही मूर्ती परत करत आहोत.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सर्व 14 मूर्ती कोतवालीत जमा करण्यात आल्या असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.