सुन्नी वफ्फ बोर्डाव्यतिरिक्त अन्य मुस्लिम पक्षकारांचा तडजोडीस नकार

अन्य मुस्लिम पक्षकार कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत.

Updated: Oct 18, 2019, 01:42 PM IST
सुन्नी वफ्फ बोर्डाव्यतिरिक्त अन्य मुस्लिम पक्षकारांचा तडजोडीस नकार title=

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सुन्नी वफ्फ बोर्डाने ही वादग्रस्त जमीनवरील दावा सोडण्यास तयार असले तरी अन्य मुस्लिम पक्षकार कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाहीत. मध्यस्थी करुन यामध्ये कोणताही तोडगा निघणार नसल्याचे इतर मुस्लिम पक्षकारांनी जाहीर केले.

आता मध्यस्थीद्वारे तोडगा निघण्याची शक्यता नाही असे मुस्लिम पक्षांनी निवेदन जारी केले. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे.

दरम्यान या खटल्याची रोज सुरू असलेली सुनावणी आजच ५ वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयात एका वकिलाने आणखी वेळ मागितला असताना न्यायालयाने इनफ इज इनफ असं सुनावलं.

नकाशा फाडला 

रामजन्मभूमी खटल्यात अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू असताना मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी 'हाय-व्होल्टेज' ड्रामा केला. हिंदू पक्षाचे वकील विकास सिंह यांनी काही नकाशे कोर्टासमोर ठेवले. तसंच वादग्रस्त जमिनीवर मंदिर असल्याचं सिद्ध करण्यासाठी आयपीएस किशोर कुणाल यांच्या 'अयोध्या रिव्हिजिटेड' या पुस्तकाचा हवाला दिला. मात्र, हा दावा राजीव धवन यांनी फेटाळून लावला. त्यानंतर विकास सिंह यांनी त्यांच्यासमोर नकाशा ठेवला असता धवन यांनी तो फाडून टाकला. त्यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशीच परिस्थिती राहिली तर आता सुनावणी संपल्याचं जाहीर करून लेखी स्वरुपात युक्तिवाद घेणार असल्याची तंबी दिली.

'आमच्या बाजूने निर्णय'

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी आनंद व्यक्त केलाय. आपल्याच पक्षात निर्णय येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील वरुण सिन्हा यांनीही 'न्यायावर सगळ्यांचा विश्वास असून आमच्याच बाजूनं निर्णय येईल' असं म्हटलंय.