अलिशान बंगला, फॉर्म हाऊस आणि महागडी दारू... 30 हजार पगार असलेल्या इंजिनिअरची 7 कोटींची प्रॉपर्टी

30 हजार पगार असलेल्या एक महिला सहाय्यक अभियंत्याच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची संपत्ती उघड झाली आहे. सलग दोन दिवस छापेमारी सुरु असून बेहिशोबी संपत्तीची मोजदाद सुरुच आहे.  

राजीव कासले | Updated: May 12, 2023, 02:12 PM IST
अलिशान बंगला, फॉर्म हाऊस आणि महागडी दारू... 30 हजार पगार असलेल्या इंजिनिअरची 7 कोटींची प्रॉपर्टी title=

Crime News : 30 हजार पगार असलेल्या एका महिला अभियंत्याच्या (Engineer) घरी पोलिसांनी मारलेल्या छाप्यात तिची अलिशान लाइफस्टाईल पाहून सर्वच थक्क झाले. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) पोलीस गृहनिर्माण महामंडळात कंत्राटी पद्धतीवर नियुक्त असलेली प्रभारी सहायक अभियंता हेमा मीना (Hema Meena) हिच्या घरी आणि फार्महाऊसवर (Farm House) सलग दोन दिवस पोलिसांची छापे मारी सुरु आहे. हेमा मीना हिच्याविरोधात उत्पन्नाहून अधिक बेहिशोबी मालमत्ता जमवल्याची (Uncountable wealth) तक्रार लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आलीहोती. त्यानंतर तिच्या घरावर छापेमारी करण्यात आली. 

चक्रावून टाकणारी संपत्ती
हेमा मीना हिची आतापर्यंत तब्बल 7 कोटींच्या संपत्तीचा पोलिसांनी शोध लावला असून आणखी तपास सुरु आहे. हेमा मीना हिच्या नावावर अलिशान बंगला, फॉर्म हाऊस, 2 ट्रक, एक टँकर, एक महिंद्रा थारसह दहा गाड्यांची नोंद आहे. याशिवाय फार्महाऊसवर एक स्पेशल रुम बनवण्यात आला होता. ज्यात महागड्या मद्याच्या बाटल्या आणि ब्रँडेड सिगरेट ठेवण्यात आल्या होत्या. तसंच फार्महाऊसवर 98 इंचाचा टीव्ही लावण्यात आला होता. ज्याची किंमत 30 लाख रुपये इतकी आहे. 

फार्महाऊसवर विदेशी श्वान
लोकायुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात सात कोटींची बेहिशोबी संपत्ती उघड झाली आहे. यात जमीन, गाड्या, बिलखिरिया इथं असलेला फॉर्महाऊस अलिशान बंगला, लाखो रुपयांची कृषी उपकरणं यांच्यासह विदेशी ब्रिडचे श्वानही (Foreign breed dogs) सापडले आहेत. याशिवाय 60 ते 70 हायब्रीडच्या गायी देखील आहेत. 

आर्थिक परिस्थिती होती बेताची
सहाय्यक अभियंता म्हणून नोकरीवर रुजू झालेल्या हेमी मीणा हिच्या कुटुंबाची काही वर्षांपूर्व आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण गेल्या काही वर्षात अचाक तिच्या संपत्तीची कोट्यवधी रुपयांची वाढ झाली. ही संपत्ती आपले वडिल आणि भावाने विकत घेऊन आपल्याला दान दिली आहे असा दाव हेमा मीणा हिने केला आहे. हेमी मीणा हिच्याविरोधात पहिल्यांदा 2020 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यात बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासात हेमाना काही जमीन आपल्या वडिलांच्या नावावर विकत घेतल्याचं समोर आलंहोतं. हेमी मीणाने मोठ्या प्रमाणावर शेतजमीन विकत घेतली आहे. याशिवाय शेतीसाठी लागणारं अत्याधुनिक उपकरणं यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर, भूसा बनवणारी मशीन या साहित्यांचा समावेश आहे. लोकायुक्तांनी आतापर्यंत केलेल्या तपासात हेमी मीणा हिच्या उत्पन्नापेक्षा 332 टक्के बेहिशोबी संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.