Mount Everest Summit Video : ट्रेकिंगची आवड असणाऱ्या अनेकांसाठीच काही ट्रेक, काही डोंगर, पर्वतरांगा हे मैलाचे दगड ठरतात. मजल दरमजल गाठत ही ट्रेकर मंडळी सरतेशेवटी एव्हरेस्ट नावाच्या महाभयंकर आणि अनेकांसाठीच अशक्य असणाऱ्या जगातील सर्वाधिक उंचीच्या हिमशिखरावर चढाई करण्याची मोहिम अनेकजण हाती घेतात. कित्येकांना हे आव्हान फार सोपं वाटतं. पण, खरी परिस्थिती मात्र तिथं प्रत्यक्षात पोहोचल्यावरच लक्षात येते. हरियाणातील गिर्यारोहत नरेंद्र सिंह यादव यांनीही एव्हरेस्टचं काहीसं असंच वर्णन केलं आहे.
PTI नं त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, एव्हरेस्टची आणि त्याच्या प्रत्यक्ष रुपाची उंची या व्हिडीओतून लक्षात येते. 25 डिसेंबर रोजी यादव यांनी अंटार्क्टीकातील सर्वात उंच विंसम मॅसिफ शिखर सर करत विक्रमी कामगिरी केली. या क्षणी शिखरावरील तापमान होतं -52°C. आपल्या गिर्यारोहणाच्या आणि जगातील 7 सर्वात उंच शिखरं सर करण्याचा विक्रम करणाऱ्या यादव यांनी हा अनुभव नुकताच सर्वांसमोर आणला.
एव्हरेस्टवर मृतदेहांचा खच पडलाय. काही गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी खासगी संस्थांना पैसे देऊन इथं येतात. पण ते तिथंच राहतात. कारण, एव्हरेस्ट दिसतो तितका सहज नाही, एव्हरेस्ट थट्टेचा विषयच नाही. जिथं प्राणवायू संपतो तिथूनच एव्हरेस्टची खरी चढाई सुरू होते. तांत्रिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नसाल तर शेर्पांच्या आधारावर तुम्ही इथं दोन ते 4 दिवस राहू शकता, असं ते म्हणाले. सुरुवातीला शेर्पांचा आधार पण, पुढचं काय? असा सवालही त्यांनी इथं उपस्थित केला.
VIDEO | "Mount Everest has a lot of dead bodies. Those who go there without proper training and hire private companies, they... Everest is not a joke. If you are not physically and mentally fit, then you may survive with the help of the Sherpa for a few days, but the expedition… pic.twitter.com/42P76YrM7G
— Press Trust of India (@PTI_News) January 1, 2025
जगातील सर्वात उंच शिखरावर चढाई करणाऱ्यांना हे शिखर त्याचं कणखर आणि रौद्र रुप दाखवतं तेव्हातेव्हा अनेकांचा शेवट त्याच शिखरावर होतो हे वास्तव नाकारता येणार नाही. विज्ञान, तंत्रज्ञानही या शिखरापुढे फिकं पडतं. हिमालय पर्वतरांगेतील या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची 8848.86 मीटर इतकी असून ते नेपाळ- चीनच्या सीमाभागात हा पर्वत उभा आहे. नेपाळमध्ये सागरमाथा अशी त्याची ओळख, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा नावानं त्याला ओळखतात.