तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...

Crime News In Marathi: तीन मुलांच्या आईचे तरुणावर प्रेम जडले. मात्र त्याने लग्नाला नकार देताच तिने केले भयानक कृत्य 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 30, 2024, 09:20 AM IST
तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...  title=
Mother of three children attack with acid on youth face for refusing to marry her

Crime News In Marathi: आग्रा येथे एका महिलेने एकतर्फी प्रेमातून कथित प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर या चालाख महिलेने या घटनेनंतर स्वतःवरच अॅसिड हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी चौकशी करुन महिलेला ताब्यात घेतलं आहे. 

अॅसिड हल्ला झालेल्या तरुणाचे नाव हेमशंकर हे असून तो आग्रा येथील विकास कॉलनी येथे राहतो. हेमशंकर याचे खंदारी परिसरात एक दुकान आहे. जवळपास 6 महिन्यांपूर्वी हेमशंकर याच्या दुकानात आरोपी महिला आसमा सामान खरेदी करण्यासाठी आली होती. त्यानंतर त्यांची ओळख वाढत गेली. दोघंही सतत एकमेकांशी बोलत असायचे. आसमाला तीन मुलं आहेत. असं असतानाही ती हेमशंकरच्या प्रेमात पडली. मात्र एकीकडे हेमशंकर याचे लग्न दुसरीकडे ठरलं होतं. त्यानेच आसमाला याची माहिती दिली. 

हेमशंकर याचे लग्न ठरल्याचे ऐकून आसमा चिडली. तिने त्याला हे लग्न करु नकोस लग्न मोडून टाक असा आग्रह केला. सुरुवातीला त्याला आसमा मस्करी करत असेल असे वाटले. मात्र त्यानंतर सातत्याने आसमा त्याच्यावर लग्न मोडण्यासाठी दबाव टाकत होती. तेव्हा हेमशंकरला कळलं की हे प्रकरण गंभीर आहे. तेव्हा त्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तु तीन मुलांची आई आहेस, असंही तिला सांगितलं. तसंच, त्याने लग्न मोडण्यासही लग्न नकार दिला. 

हेमशंकर याने आसमाला लग्न मोडण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. अॅसिडमुळं हेमशंकरच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या खांद्यावरही अॅसिड पडले आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की त्याच्या शरीरावरील गंभीररित्या भाजले आहे. हेमशंकर यात गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याचवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आरोपी महिलेने तिच्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून पोलिसांनाच फोन करुन हेमशंकरवर अॅसिड हल्ला केल्याचे सांगितले. तिनेच पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करुन त्याच्यावर कोणीतरी अॅसिड हल्ला केल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आसमा घटनास्थळावरुन फरार झाली होती. पोलिसांनी तिचा फोन नंबर घेतला आणि सर्व्हिलांसवर लावला. त्यामुळं आसमाचे लोकेशन पोलिसांना कळले आणि त्यांनी तिला अटक केली आहे. आसमाला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.