Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

Monsoon News : वाढता उकाडा सध्या सर्वत्र अडचणी वाढवत असतानाच या परिस्थितीत दिलासा देणारं महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.   

सायली पाटील | Updated: May 29, 2024, 02:13 PM IST
Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार title=
Monsoon to arrive in kerala by next 24 hours latest weather news

Monsoon News : देशात एकिकडे तापमानानं पन्नाशीचा आकडा ओलांडलेला असतानाच या प्रचंड उकाड्यामध्ये दिलासा देण्यासाठी मान्सून सज्ज झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल होण्याचा प्राथमिक आणि महत्त्वाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

सध्या मान्सूनच्या प्रवासाच्या अनुषंगानं आणि हे मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचीही माहिती हवामान विभागानं दिली. प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण, तो अशाच वेगानं पुढे येत राहिला तर काही तास आधीच केरळची वेस ओलांडू शकतो. दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात म्हणजेच 31 मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्यानं तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित असल्याचं हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. 

महाराष्ट्रात केव्हा दाखल होईल मान्सून? 

केरळात 30 ते 31 मे पर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर आता तो महाराष्ट्रात केव्हा येणार असाही प्रश्न अनेकांनीच विचारला. महाराष्ट्राआधी मान्सून कर्नाटकात प्रवेश करणार असून त्यासाठी 6 किंवा 7 जूनची तारीख वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात 10 ते 11 जूनदरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, मुंबईपासून मान्सूनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 13 ते 14 जूनपर्यंत मान्सून बंगळुरूपर्यंत मजल मारेल असं सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : पुण्यात अचानक वाढला गारठा; तापमानात 10 अंशांनी घट 

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार अल निनो सध्या कमकुवत होत असून, ला निना सक्रीय होताना दिसत आहे. ज्यामुळं यंदाच्या वर्षी देशात मान्सून सर्वसामान्य असेल असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, त्यामुळं शेतकरी वर्गही सुखावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.