नवी दिल्ली : राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पेटला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज आहे. तर शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यासाठी चाचपणी करत आहे. पण युतीलाच जनतेने कौल दिला असून आम्हाला विरोधात बसण्याचे जनमत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची बैठक पार पडली आहे.
मोदी शहांची बैठक नुकतीच संपली असून यामध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायची नाही असे या बैठकीत ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील यावर या बैठकीत निर्णय झाला.
शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.