Central Government Is Weak: राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार महिन्याभरात पडू शकतं असं भाकित व्यक्त केलं आहे. केंद्रातील सरकार हे कमकूवत आहे. हे सरकार पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये पडू शकतं असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यामधील एका कार्यक्रमामध्ये लालू प्रसाद यादव बोलत होते. जनता दलमधून वेगळं होऊन आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केल्याच्या घटनेला 28 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात लालू प्रसाद यादव यांनी हे विधान केलं.
लालू प्रसाद यादव हे त्यांचा मुलगा आणि वारस असलेल्या तेजस्वी यादव यांच्याबरोबर शुक्रवारी पाटण्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रकृतीसंदर्भातील समस्या असतानाही लालू प्रसाद यादव यांनी 10 मिनिटं भाषण केलं. आपल्या या भाषणामध्ये लालू प्रसाद यादव यांनी, "केंद्रातील मोदी सरकार फार कमकूवत आहे. हे सरकार कधीही पडू शकतं. हे सरकार ऑगस्टमध्ये पडू शकतं. तयार राहा," असं विधान केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
अचानक केंद्रातील सरकार पडलं तर पक्ष कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीसाठी तयार रहावं असं आवाहनही लालू प्रसाद यादव यांनी केलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमधून प्रेरणा घ्यावी असंही लालू म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाने मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक जागांवर विजय मिळवण्याबरोबरच मतांची टक्केवारी वाढण्यातही यश मिळवल्याने यामधून प्रेरणा घेण्याची सूचना लालू यांनी केली.
"आपण मागील बऱ्याच काळापासून बिहारच्या विधानसभेमधील सर्वात मोठा पक्ष होतो. तसेच इतरांप्रमाणे आपण कधीच आपल्या विचारसरणीबरोबर तडजोड केली नाही," असं म्हणत लालू यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री नितीश कुमार यादव यांचा थेट उल्लेख न करता टोला लगावला.
भारतीय जनता पार्टीबरोबर असलेल्या पक्षांचे खासदारांची नुकतीच पाटण्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्रात मंत्रीपद मिळालेल्या खासदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच लालू प्रसाद यादव यांनी विचारसणीवरुन टोला लगावल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला देशात अपेक्षित यश मिळालेलं नाही. 400 हून अधिक जागा जिंकण्याचा मानस व्यक्त करणाऱ्या भाजपाला मित्रपक्षांसहीत 293 जागांपर्यंत मजल मारता आली. भाजपाला केंद्रात मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्याच्या दृष्टीने तेलगु देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला. इंडिया आघाडीने अपेक्षितरित्या 233 जागांपर्यंत मजल मारली. इतर 17 अपक्ष खासदार निवडून आले. या आकडेवारीच्या जोरावर लालू प्रसाद यादव यांनी सरकार कधीही पडू शकतं अशी शक्यता व्यक्त केली आहे.