कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोदी सरकार देणार 5000 रुपये?

जाणून घ्या काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य...  

Updated: Jan 12, 2022, 05:22 PM IST
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोदी सरकार देणार 5000 रुपये? title=

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत केंद्र सरकारकडून गरिबांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. गरिबांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून रेशनपासून अन्य सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या योजनांची माहिती देणारे अनेक मेसेज व्हायरल झाले. त्यात आता आणखी एका मेसेजची भर पडली आहे.

हा मेसेज आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गरिबांना मोदी सरकारकडून ५ हजार रुपये मिळत असल्याचा. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये केंद्र सरकार कोरोना फंड अंतर्गत 5000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या संदेशासोबत एक लिंकही देण्यात येत आहे. तसेच, जर तुम्हालाही 5000 रुपये मिळवायचे असतील तर लवकर फॉर्म भरा, असे या मेसेजमध्ये लिहिले आहे.

सरकार खरंच 5000 रुपये देतेय?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तिसऱ्या लाटेपर्यंत केंद्र सरकारकडून गरिबांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे हा मेसेजही खरा असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पीआयबीने या संदेशाची सत्यता तपासली असता त्यातून या व्हायरल होत असलेल्या मेसेजचे सत्य समोर आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे सांगण्यात आले.  

पीआयबीने तपासली वस्तुस्थिती
पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'या फेक मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना फंड अंतर्गत 5000 ची रक्कम दिली जात आहे.' हा संदेश पूर्णपणे खोटा आहे. 

असा कोणताही फेक मेसेज फॉरवर्ड करू नका असे आवाहन पीआयबीने केले आहे. लोकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवणे हा या ट्विटचा उद्देश असल्याचेही पीआयबीने म्हटले आहे. 

तुम्ही देखील यातील तथ्य तपासू शकता
जर असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आला आणि तुम्हाला त्याचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही तथ्य तपासू शकता. यासाठी तुम्हाला PIB च्या अधिकृत फेसबुक पेज https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर देखील माहिती देऊ शकता.