श्रीनगर : अनुच्छेद ३७० रद्द् झाल्याच्या ६८ दिवसांनंतर अखेर जम्मू-काश्मीरमधली पोस्टपेड मोबाईल सेवा सुरु करण्यात येत आहे. आज दुपारनंतर या मोबाईल सेवेचा लाभ नागरिक घेऊ शकणार आहेत. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात ही पोस्टपेड मोबाईल सेवा उपलब्ध असणार आहे. शनिवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहीती दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० पाच ऑगस्टला हटवण्यात आले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. मोबाईल फोन सेवा आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. यावेळी जम्मू आणि लडाख क्षेत्रात मोबाइल सेवा सुरु होती. पण काश्मीर घाटीमध्ये पाच ऑगस्टपासूनच यावर प्रतिबंध होता.
J-K: Postpaid mobile services to be functional in Valley from today afternoon
Read @ANI story | https://t.co/O588FSknk6 pic.twitter.com/W58evK1Fll
— ANI Digital (@ani_digital) October 14, 2019
घाटीमधील परिस्थीतीमध्ये सुधारणा आल्यानंतर सोमवारी सकाळी पोस्टपेड मोबाइल फोन सेवा पुर्वरत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारचे प्रवक्ता रोहित कंसल यांनी दिली. इंटरनेट सेवा पुर्वरत होण्याबाबत कोणतीही अधिकृत सुचना देण्यात आली नाही. घाटीमध्ये पाच ऑगस्टपासून इंटरनेट सेवा बंद आहे. याआधी ४ सप्टेंबर पासून जम्मू काश्मीरची लॅंडलाईन सेवा सुरु करण्यात आली होती.
सुरुवातीला केवळ बीएसएनल पोस्टपेड मोबाईलवर फोन कनेक्टिव्हीटी पुर्वरत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण काही स्थानिकांकडे बीएसएनएलचे पोस्टपेड कनेक्शन नाही आहे. त्यामुळे विविध मोबाईल फोन सेवा पुर्वरत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पर्यटक उद्योगाशी जोडले गेलेले स्थानिक याची जोरदार मागणी करत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे बुकींग सुनिश्चित करुन त्यांच्याशी संपर्क व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत.
याआधी जम्मू आणि काश्मीरमध्ये शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था पूर्वरत सुरु करण्यात आल्या. यामध्ये सध्या विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत आहे.