नवी दिल्ली : दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर देशाच्या राजधातीत अत्यंत खळबळजनक घटना घडल्याचं पाहायला मिळालं. गँगवॉर झाल्यानंतर काही दिवसांनीच फिटनेस मार्गदर्शक आणि टिक-टॉकमुळे प्रकाशझोतात आलेल्या मोहित मोर याची हत्या झाली आहे.
मित्राला भेटण्यासाठी धरमपूरा येथे असणाऱ्या नजमगढ परिसरातील त्याच्या दुकानात गेलं असता २७ वर्षीय मोर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 'मोहित मोर हा त्याच्या मित्राशी बोलण्यात मग्न असतानाच चेहरा झाकलेले तीन सशस्त्र इसम त्या दुकानात आले आणि त्यांनी १३ गोळ्या झाडल्या. मोहित त्याच ठिकाणी असणाऱ्या एका सोफ्यावर पडला. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण, तेथे त्याचा मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं कळत आहे.
गुन्हा झाल्यानंतर स्कुटीवरुन आलेले तिन्ही आरोपी चिंचोळ्या रस्त्यांवरुन पळ काढत असल्याची दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. टिक-टॉक या अॅपमुळे मोहित बराच चर्चेत आला होता. या अॅपवरील त्याची लोकप्रियता पाहता टिक- टॉक स्टार अशीही त्याची ओळख झाली होती. लाखो फॉलोअर्स असणआऱ्या मोहितचं स्थानिकांशी फारसं चांगलं नातं नसल्याचं म्हटलं जात आहे.
मुख्य म्हणजे फक्त टिक- टॉकच नव्हे, तर इन्स्टाग्राम या अॅपवरही त्याचे जवळपास ३ हजार फॉलोअर्स आहेत. फिटनेसविषयीचे अनेक व्हिडिओ शेअर करत असल्यामुळे त्याच्या फॉलोअर्सचा आकडा वाढला होता. दरम्यान, सध्याच्या घडीला त्याची हत्या करण्यामागची कारणं आणि या प्रकरणीच्या तापासाला वेग आला आहे. तपास प्रक्रियेसाठी त्याच्या टिक-टॉक आणि इन्स्टाग्रामवरील पोस्ट आणि त्या पोस्टवर आलेल्या कमेंट्सही पाहण्यात येत आहेत. हत्येशी निगडीत धागेदोऱ्यांचा सुगावा लावण्यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत.