Manipur Violence: मणिपूरमधल्या महिलांवरील क्रूरता आणि अत्याचाराची आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. कुकी (Kuki) समाजातील दोन तरुणींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्य दाखवलं नसल्याचा आरोप केला जातआहे. जमावाने या तरुणींवर अत्याचार करत त्यांची हत्या केली (Raped and Murder). या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) घडला होता. मणिपूरच्या खांगपोकी जिल्ह्यातल्या बी फैनोम गावात दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या घटनास्थळापासून 40 किलोमीटर दूर इंफाळमधल्या कोनुंग ममांग इथं हा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेत 21 आणि 24 वर्षांच्या दोन तरुणींना जमावाने लक्ष्य केलं. या दोन तरुणींवर काही महिला आणि पुरुषांच्या जमावाने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार जमावातील महिलांनी त्या दोन तरुणींवर अत्याचार करण्यासाठ पुरुषांना प्रोत्साहित केलं. त्यानंतर पुरुषांनी त्या दोन्ही तरुणींना एक बंद खोलीत नेलं. त्या ओरडू नयेत यासाठी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला. या सर्व गोष्टींसाठी जमावातील महिलाही पुरुषांना मदत करत होत्या. जवळपास दीड तासांनी त्या मुलींनी घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यानतंर त्यांना रस्त्यावर फेकून दिलं.
त्या तरुणींचे कपडे पूर्णपण फाटले होते आणि शरीरातून रक्त वहात होतं. त्या मुलींचे केसही कापण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर जमावाने त्या दोनही मुलींची निर्घृण हत्या केली. भीतीपोटी सुरुवातीला या मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली नाही. शेवटी त्यातल्या एका मुलीच्या आईने हिम्मत करत पोलिसात झीरो एफआयआर दाखल केली. एफआयआरमध्ये आपल्या मुलीवर आणि तिच्या मैत्रीणीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचं पीडित मुलीच्या आईने म्हटलं. त्या मुलींचे मृतदेह अद्याप सापडले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. हल्लेखोरांची संख्या जळवपास दीडशे ते दोनशे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही.
आतापर्यंत 5 आरोपींना अटक
दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेत आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातल्य चार आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मणिपूरमध्ये 3 मे ते 28 जूनपर्यंत तब्बल 5,960 FIR झाले आहेत. यातली 1,771 प्रकरणं झीरो FIR च्या स्वरुपात दाखल आहेत. यातली अर्ध्याहून अधिक प्रकरणं ही महिलांवरील अत्याचाराशी संबंधीत आहेत.