...म्हणून 'त्या' व्यक्तीने हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली

पाटीदार समाजाचे आंदोलन सुरु असताना माझी पत्नी गरोदर होती.

Updated: Apr 19, 2019, 06:32 PM IST
...म्हणून 'त्या' व्यक्तीने हार्दिक पटेलच्या कानाखाली मारली title=

अहमदाबाद: गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना शुक्रवारी प्रचारसभेत एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली. सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत हार्दिक पटेल भाषण करत असताना हा प्रकार घडला. यावेळी तरुण गुज्जर नावाची व्यक्ती स्टेजवर आली आणि त्याने हार्दिक यांच्या कानशिलात लगावली. यानंतर स्टेजवरील कार्यकर्त्यांनी तरुणला पकडून चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी जखमी अवस्थेतील तरुणला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. तेव्हा तरुण गुज्जरने हार्दिकला मारहाण करण्यामागचे खरे कारण सांगितले. 

तरुणने म्हटले की, गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे आंदोलन सुरु असताना माझी पत्नी गरोदर होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यावेळी पाटीदार आंदोलन पेटल्यामुळे आम्हाला बराच त्रास सहन करावा लागला. त्यावेळीच मी काहीही करून हार्दिक पटेलला धडा शिकवायचे ठरवले होते. यानंतर हार्दिक यांच्या अहमदाबाद रॅलीच्यावेळीही माझा मुलगा आजारी होता. मी औषधे आणण्यासाठी दुकानात गेलो. मात्र, रॅलीमुळे सर्वकाही बंद होते. हार्दिक पटेल यांच्यामुळे संपूर्ण गुजरात बंद झाला होता. हार्दिक पटेल हिटलर आहेत का, असा सवालही तरुण गुज्जर यांनी विचारला. 

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात तरुण गुज्जर कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.हार्दिक पटेल यांना जामनगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. परंतु, न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज वेळेत दाखल करता आला नव्हता.